Join us

हे आहे ​तुझ्यात जीव रंगलामधील राणा म्हणजेच हार्दिक जोशीच्या फिटनेसचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 15:31 IST

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा या भूमिकेमुळे हार्दिक जोशी हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्याची आणि अंजलीबाईची ...

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा या भूमिकेमुळे हार्दिक जोशी हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्याची आणि अंजलीबाईची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसचे देखील लोक चांगलेच कौतुक करतात. त्याच्या या फिटनेसचे रहस्य नुकतेच त्याने एबीपी माझा या वाहिनीशी बोलताना सांगितले आहे. तो सांगतो, मालिकेत मी तालमीतील पैलवान आहे असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचप्रकारे माझी शरीरयष्टी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मी पैलवान आहे असे दाखवण्यात आले असल्यामुळे मी एखाद्या पैलवानाप्रमाणेच जेवतो. मी दिवसाला २० अंडी आणि पाऊण किलो चिकन खातो. या शिवाय सलाड, प्रोटिन्स या गोष्टीचाही माझ्या खाण्यात नक्कीच समावेश असतो. पण मला या जेवणापेक्षा साधे वरण, भात आणि बटाट्याच्या काचऱ्या अधिक आवडतात. तेही माझ्या आईने बनवलेले भात, वरण, तूप आणि बटाट्याच्या काचऱ्या हा तर माझा सगळ्यात आवडता आहार आहे. सध्या माझ्या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूरमध्ये सुरू आहे. चित्रीकरण सुरू नसताना मी घरी गेलो की, माझी आई माझ्यासाठी माझे हे आवडते जेवण आवर्जून बनवते. हार्दिक फिटनेससोबतच व्यायामावर देखील भर देतो. हार्दिक चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी दिवसातील एक तास तरी व्यायाम करतो. तुम्हाला माहीत आहे का, हार्दिकला अभिनेता बनायचे नव्हते तर त्याला आर्मीत भरती व्हायचे होते. त्याने याविषयी देखील एबीपी माझीशी गप्पा मारल्या आहेत. तो सांगतो, मला खरंतर आर्मीत जायचे होते. २०११ मध्ये माझी आर्मीत निवड झाली होती. मी चंदिगडमध्ये एसएसबीचे ट्रेनिंग देखील केले होते. पण काही कारणामुळे मला आर्मीतून कॉल आला नाही. पण आजही माझी आर्मीत भरती व्हायची इच्छा आहे. हार्दिक मुंबईतील अॅन्टॉप हिलमध्ये लहानाचा मोठा झाला आहे. खालसा कॉलेजमध्ये असताना त्याने मॉडलिंगला सुरुवात केली. त्याने रंगा पतंगा या चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. तसेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या आधी त्याने अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. Also Read : तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर सांगतेय, माझ्याबद्दलची ही माहिती पूर्णपणे चुकीची