'सावळ्याची जणू सावली' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील सावली ही विठ्ठलाची निस्सिम भक्त आहे. सावलीचे कुटुंबीयही विठ्ठलाची सेवा करतात. आषाढी एकादशीनिमित्त 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत वारीचा प्रसंग दाखवण्यात येत आहे. सावलीचे आईवडील आषाढी वारी करण्यासाठी जातात. मात्र रस्त्यातच त्यांना चक्कर येते. 'सावळ्याची जणू सावली' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये आईवडिलांना शोधत सावली वारीमध्ये येत असल्याचं दिसतं. पण, तिला आईबाबा सापडत नाहीत. ती त्यांना शोधताना दिसत आहे. दुसरीकडे सारंगची गाडीही बंद पडत असल्याचं दिसत आहे. आईबाबांना शोधण्यासाठी तो सायकलवरुनच येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सावलीच्या आईवडिलांसाठी सारंग श्रावणबाळ होऊन त्यांना वारी पूर्ण करण्यासाठी मदत करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. "कावड घेऊनी आपल्या खांद्यावरी, सारंग चुकू द्यायचा ना वारी" असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.
'सावळ्याची जणू सावली' मालिकेच्या या प्रोमोवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. "यावर्षीची आषाढी वारी सारंग आणि सावली पूर्ण करणार आहे. हीच विठू रायाची इच्छा आहे", "खूप सुंदर", "अंगावर शहारे आले", "असं काहीतरी चांगलं दाखवलं पाहिजे", अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत. 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील आषाढी एकादशीनिमित्त २-६ जुलै विशेष भाग दाखवण्यात येणार आहेत.