Join us

कोल्हापुरात ४० फूट खोल विहिरीत मारली उडी अन्..; समृद्धीने 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केला धाडसी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:29 IST

समृद्धी केळकरने 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेसाठी केलेला धाडसी स्टंट चर्चेत आहे. यासाठी समृद्धीने कोल्हापूरातील एका ४० फूट खोल विहिरीत उडी मारली आहे

सध्या स्टार प्रवाहवर नव्यानेच रिलीज झालेल्या 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेची खूप चर्चा आहे. या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु होताच प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी मालिकेला चांगला प्रतिसाद दिला आहे. या मालिकेसाठी समद्धी केळकरने ४० फूट खोल विहिरीत उडी मारली. समृद्धीने या सीनचा थरारक अनुभव सांगितला आहे.

काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक होताना दिसतंय. या मालिकेतील जिगरबाज कृष्णा प्रेक्षकांना विशेष भावतेय. कृष्णाने तिची लाडकी गाय स्वातीला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतलाय. शेतातल्या विहिरीत स्वाती पडल्याचं कळताच मागचा पुढचा कोणताही विचार न करता कृष्णाने या विहिरीत उडी मारली. मालिकेतला हा अतिशय कठीण प्रसंग कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने जिद्दीने पूर्ण केला.

या अनुभवाविषयी सांगताना समृद्धी म्हणाली, "मला पोहायला येतं मात्र इतक्या खोल पाण्यात मी कधीही उतरले नव्हते. या सीनविषयी कळताच तो कसा शूट होणार याची उत्सुकता होती. अखेर शूटचा तो दिवस उजाडला. कोल्हापुरातल्या एका शेतातल्या ४० फूट खोल विहिरीत उडी मारण्याचा सीन होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका टेकमध्ये हा सीन पूर्ण करायचा होता. मी कोणताही बॉडी डबल न घेता हा सीन करण्याचा ठरवलं."

"मनाची तयारी केली आणि मी विहिरीत उडी घेतली. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. मालिकेच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आणि माझी काळजीही घेतली. दोन पट्टीचे पोहणारे विहिरीत माझ्यासोबत होते. मला धाडसी प्रयोग करायला नेहमीच आवडतं. या सीननंतर माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे असंच म्हणेन." हळद रुसली कुंकू हसलं दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठीमराठी अभिनेता