Join us

पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:31 IST

Salman Khan : सलमान खानने 'बिग बॉस'च्या घरातील सर्व स्पर्धकांना पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचलमधील पूर परिस्थितीची माहिती दिली.

'बिग बॉस १९'(Bigg Boss 19)चा प्रत्येक वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असतो. कारण या वेळी शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) फक्त घरातील सदस्यांशी थेट संवाद साधत नाही, तर त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल त्यांना दमदेखील देतो. या वेळीही असेच घडले. सलमान खानने घरातील सर्व स्पर्धकांचा खरपूस समाचार घेतला. यासोबतच त्याने एक गंभीर मुद्दाही उपस्थित केला.

सलमान खानने घरात वाया जाणाऱ्या अन्नावर आपली नाराजी व्यक्त केली. या दरम्यान, त्याने फरहाना आणि बसीर यांच्यात एका चमचा पोह्यावरून झालेल्या भांडणाचाही उल्लेख केला. तसेच, घरातील सदस्य रोज जेवणाबद्दल तक्रारी करतात, तरीही ते अन्न व्यवस्थित सांभाळून का ठेवत नाहीत, असा सवालही त्याने विचारला. सलमानच्या या स्पष्ट बोलण्यामुळे स्पर्धकांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमानचं आवाहनसलमान खानने 'बिग बॉस'च्या घरातील सर्व स्पर्धकांना पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचलमधील पूर परिस्थितीची माहिती दिली. तो म्हणाला, ''तुम्हाला माहीत आहे का, उत्तराखंड, हिमाचल आणि पंजाबची काय अवस्था आहे? तिथे पुरामुळे हाहाकार माजला आहे. जे शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतात, त्यांच्याकडे आज खायला धान्य नाही. त्यांची घरे वाहून गेली आहेत, परिस्थिती खूपच वाईट आहे.''

सलमानने पुढे सांगितले की, "हे लोक लंगरसाठी प्रसिद्ध आहेत. किती वर्षांपासून त्यांनी लोकांना जेवण दिले आहे. त्यांच्या लंगरात कोणीही आले तर त्याला उपाशी परत पाठवले जात नाही. आता त्यांच्यावरच संकट आले आहे आणि अशा वेळी त्यांच्यासाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्य आहे. पंजाबमधील गायकांनी खूप मदत केली आहे आणि आम्हीही इथून मदत करत आहोत."

सलमानने दिलेली शिकवणसलमान खानने 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांना अन्न आणि शेतकऱ्यांचे महत्त्व पटवून दिले. त्याच्या या बोलण्यामुळे घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आले. तो म्हणाला, "हे जे पोहे आहेत, ते तांदळापासून बनविले जाते. फरहाना, अन्नाचा अनादर करू नका. आपल्या संस्कृतीमध्ये ताटातील शेवटचा कणही खाल्ला जातो, जेणेकरून अन्न वाया जाऊ नये. कोणीही अन्न वाया घालवू नये. तुम्हाला या गोष्टीची कदर करायला हवी."

टॅग्स :सलमान खानबिग बॉस १९पंजाब