सलीम खान यांनी माय लाइफ माय स्टोरीमध्ये सलमान खानचे सांगितले हे सिक्रेट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 13:26 IST
माय लाइफ माय स्टोरी हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित व्यक्ती दिलखुलास गप्पा मारताना ...
सलीम खान यांनी माय लाइफ माय स्टोरीमध्ये सलमान खानचे सांगितले हे सिक्रेट्स
माय लाइफ माय स्टोरी हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित व्यक्ती दिलखुलास गप्पा मारताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध आरजे अनमोल करणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात प्रसिद्ध लेखक सलीम खान हजेरी लावणार आहेत. सलीम खान इंदौरहून मुंबईला खरे तर अभिनय करण्यासाठी आले होते. त्यांनी काही चित्रपटात प्रमुख भूमिकादेखील साकारल्या होत्या. पण त्यांना अभिनयक्षेत्रात म्हणावे तसे यश मिळाले नाही. याचवेळी त्यांचे लेखनदेखील सुरू होते. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी त्यांचा सगळा वेळ लेखनालाच दिला. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपट लिहिले आहे. सलीम-जावेद यांच्या जोडीने दीवार, शोले, त्रिशूल अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांचे लेखन केले आहे. माय लाइफ माय स्टोरी या कार्यक्रमात त्यांचे त्यांचा मुलगा सलमानसोबतचे नाते, गॅलॅक्सी अपार्टमेंट या त्यांच्या घरासोबत असलेले ऋणानुबंध, त्यांचे आवडते चित्रपट या अनेक गोष्टींविषयी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.सलीम खान हे प्रसिद्ध लेखक असले तरी आपला मुलगा सुपरस्टार सलमान खानसाठी ते खूपच कमी लेखन करतात. याबद्दल त्यांनी या कार्यक्रमात सांगितले की, "सलमानच्या चित्रपटांचे मी लेखन करत नाही असे नाहीये. पत्थर के फूल या चित्रपटाचे लेखन मी केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वीदेखील झाला होता. पण आज सलमानला मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीनंतर मी लिहिलेल्या एखाद्या चित्रपटात सलमानने काम केले आणि तो चित्रपट अयशस्वी झाला तर ती माझी चूक असते आणि जर यशस्वी झाला तर ती सलमानची मेहनत असते. याच कारणाने मी सलमानसोबत खूपच कमी काम करतो. तसेच सध्या मी कोणाला स्क्रिप्टसाठी पिच केले तर मला एक वेगळेच उत्तर ऐकायला मिळते. तुम्ही लिहिलेली पटकथा चांगली आहे तर सलमान यात काम का करत नाही असा समोरच्याला प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे मला या भूलभूलैय्यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे."