साताऱ्यात 'देवमाणूस-मधला अध्याय' (Devmanus-Madhla Adhyay) या झी मराठीवरील नव्या मालिकेच्या लाँचला महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) हिने हजेरी लावली होती. संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होतं कारण खास सई ताम्हणकर हिंमतराव टेलरिंग शॉपचं उद्घाटन करायला आली होती. या कार्यक्रमाला संपूर्ण गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. गोपाळच्या संपूर्ण कुटुंबाने सईचे मनापासून स्वागत केले. गोपाळने स्वतः सईला कार्यक्रमस्थळी घेऊन येत आदराने तिचं स्वागत केलं.
हिम्मतरावांनी सईचे कौतुक करत सांगितलं की, महिलांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे, म्हणूनच मी माझा मुलगा गोपाळला स्वतःचं टेलरिंग शॉप सुरू करायला मदत केली. यावेळी सरू आजीनेही आपल्या खास शैलीत संवाद साधत मजा आणली. तिचं बोलणं सगळ्यांनाच खूप भावलं. सई सगळ्यांनी दाखवलेल्या प्रेमाने भारावून गेली. तिने गोपाळला सांगितलं, “तुझं काम खूप छान आहे. तू मुंबईत टेलरिंग शॉप सुरू कर! मी तुझी पहिली ग्राहक असेन. तुझं नाव फिल्म इंडस्ट्री आणि फॅशन शोमध्येही फेमस होईल.” तिने सरू आज्जीचंही मनापासून कौतुक केलं आणि ती सरू आज्जीची फॅन असल्याचंही सांगितलं.