स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील मुक्ता, सागर आणि सई यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत मुक्ताची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने साकारली होती. मात्र अलिकडेच तिने ही मालिका सोडली आहे. तिने ही मालिका का सोडली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आता तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे(Swarada Thigale)ची एन्ट्री झाली आहे. तिने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. दरम्यान आता स्वरदाने सेटवर सईची भूमिका साकारणारी ईरा परवडेसोबतचा ट्रेडिंग रिल शेअर केला आहे.
स्वरदा ठिगळे हिने इंस्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. ज्यात ती ईरासोबत ट्रेडिंग रिल करताना दिसते आहे. हा रिल मालिकेच्या सेटवर शूट केला आहे. ईरा स्वरदाच्या गालावर किस करताना दिसते आहे. त्या दोघांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तर या रिलवर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनेदेखील कमेंट केली आहे.
नेटकरी म्हणाले...स्वरदा आणि सईच्या रिलवर अपूर्वा नेमळेकरने कमेंट केली असून तिने क्युटीज लिहून दोन हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तर एका युजरने लिहिले की, दोघे सिंपली क्युट वाटत आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले की, आता मुक्ताईच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे मला वाटते. ऑल द बेस्ट स्वरदा. आणखी एका युजरने लिहिले की, कारण काहीही असो पण लोकप्रिय मालिकेतील मुख्य पात्राचे कलाकार बदलण्याची वेळ आली खरी. आणि हे काम चांगलेच आव्हानात्मक आहे. ते स्वीकारल्याबद्दल अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा. बऱ्याच जणांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.