सा रे ग म प (Sa Re Ga Ma Pa Show) या कार्यक्रमाचा नवा सीझन दणक्यात सुरू झाला असून त्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून अत्यंत गुणी स्पर्धकांचा समावेश झाला आहे. असाच एक गुणी स्पर्धक आहे चेन्नईचा कार्तिक कृष्णमूर्ती. त्याच्या ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्याने गायलेल्या ‘ओ रे पिया’ या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध करन सोडले आहे. ऑटिसिझम या विकाराने ग्रस्त असल्याने आपल्याबद्दल लोक काय म्हणतात, ते त्याला कळत नाही. त्याला ते समजावून सांगणे हेही एक आव्हान आहे. असे असले, तरी कार्तिक अफलातून गाणे गायला असून त्यामुळे त्याची निवड मेगा ऑडिशन फेरीसाठी झाली. इतकेच नव्हे, तर त्याच्या गाण्याने केवळ परीक्षक आणि अन्य स्पर्धकच नव्हे, तर नागालॅण्डचे पर्यटन आणि उच्चशिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलाँग हेही प्रभावित झाले. त्यांनी कार्तिकच्या गाण्याचा हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, माझ्या अंगावर शहारे आले!.
कार्तिकच्या गाण्याने प्रभावित झालेला परीक्षक अनु मलिक म्हणाले, माझ्या मते, कार्तिक हा एक अभिजात गायक असून त्याच्या अशा शारीरिक स्थितीतही त्याने इतकी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परमेश्वराने कार्तिकला काही गोष्टी दिलेल्या नसल्या, तरी त्याबदल्यात त्याने त्याला काही खास गोष्टी दिल्या आहेत. मला आज त्याचं गाणं प्रत्यक्ष ऐकता आलं, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. त्याचं गाणं ऐकून दुसऱ्यांना प्रेरणा मिळते. त्याच्याकडे पाहून आपल्यालाही जीवनात विधायक दृष्टी ठेवून पुढे जाण्याचं धैर्य मिळतं. मी त्याच्या आई-वडिलांचं विशेष कौतुक करतो कारण त्याला इथपर्यंत आणण्यासाठी त्यांना खूप त्याग करावा लागला आहे. कार्तिकचा आत्मा शुध्द आहे. आपण नेहमी म्हणतो की आपण देवाला पाहिलेलं नाही. पण त्याला भेटल्यावर मी जेव्हा जेव्हा त्याच्याजवळ जातो, तेव्हा मला मला परमेश्वराचं अस्तित्त्व जाणवतं.