Join us

​खिचडी या मालिकेत सुनील ग्रोव्हर साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 13:11 IST

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या ...

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.खिचडी या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. कॉमेडी नाइट्स विथ कपिल, द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हर खिचडी या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत काम करण्यासाठी सुनीलसोबत निर्मात्यांनी करार देखील केला असून तो खिचडी या मालिकेतील पारेख कुटुंबातील एक सदस्य म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुनील शहरात नवीन आलेला असून तो शहरात घर शोधत आहे असे दाखवण्यात येणार आहे. घर मिळेपर्यंत तो प्रफुल्ल, हंसा, बाऊजी आणि जयश्री यांच्याच कुटुंबात मुक्काम करणार आहे. तो प्रफुल्लचा चुलत भाऊ असल्याचे मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.खिचडी या मालिकेची लोकप्रियता वाढविण्यासाठी त्यात सुनील ग्रोव्हर, रेणुका शहाणेसारख्या काही नव्या कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या धमाल विनोदी टिप्पणीने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगद्वारे या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांमध्ये हास्याची कारंजी निर्माण करतील यात काहीच शंका नाही. खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खिचडी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या.Also Read : ​‘खिचडी’ या मालिकेद्वारे ही अभिनेत्री करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन!