Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या कारणामुळे कपिल शर्माने मानले सोनी वाहिनीचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 15:51 IST

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो ब्रेकवर जाणार किंवा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ...

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो ब्रेकवर जाणार किंवा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या कार्यक्रमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारे सुनिल ग्रोव्हर आणि अली असगर यांनी या कार्यक्रमाला रामराम ठोकल्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी खूपच ढासळला होता. त्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण द कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. द कपिल शर्मा शो आणखी वर्षभर तर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमाचा सोनी वाहिनीसोबत असणारा करार या महिन्यात संपुष्टात आला होता. पण सोनी वाहिनीने या कार्यक्रमासोबत आणखी एक वर्षांचा करार केला आहे. सोनी वाहिनीने घेतलेल्या या निर्णयामुळे कपिल चांगलाच खूश आहे. कपिलने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, प्रेक्षकांनी मला आजवर दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा आभारी आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच सतत काम करण्यासाठी आणि लोकांना हसवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे प्रत्येक आठवड्याला आम्हाला आमच्या फॅन्सच्या चेहऱ्यावर हसू फुलवता येते. सोनी वाहिनीने आजवर मला दिलेल्या पाठिंब्यांसाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी आम्ही त्यांचे  ऋणी आहोत.द कपिल शर्मा शोमध्ये सध्या कपिलसोबत किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग आणि चंदन प्रभाकर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात बॉलिवूडमधील एक तरी सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतो. या सेलिब्रिटींसोबत कपिलच्या टीमसोबतची मजामस्ती लोकांना पाहायला मिळते.द कपिल शर्मा शोची टीम आता चांगलीच मेहनत घेत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा टिआरपी रेसमध्ये अव्वल ठरेल अशी आशा करायला हरकत नाही.