Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायण'मध्ये मंदोदरीच्या भूमिकेतील अभिनेत्री दिसते अशी, अभिनयापासून दूर राहून करते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 18:52 IST

भारत भुषण यांच्या कन्या अपराजिता यांनी मंदोदरीची रामायणात भूमिका साकारली होती. पतीच्या निधनानंतर त्यांनी अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला.

ठळक मुद्देअपराजिता यांनी गुप्त या चित्रपटानंतर कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. त्या सध्या अध्यात्मात रस घेत असून त्या संदर्भात त्या लेखन देखील करतात. 

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याच मालिकेचे अथवा चित्रपटाचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे छोट्या पडद्यावर गाजलेल्या जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. रामायण ही मालिका गेल्याच आठवड्यात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकार आता काय करतात याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या मालिकेत मंदोदरीच्या भूमिकेत असलेल्या या अभिनेत्रीमध्ये आता पूर्णपणे बदल झालेला आहे. तिला ओळखणे देखील आता कठीण जात आहे.

रामायण या मालिकेत मंदोदरीच्या भूमिकेत अपराजिता भुषण यांना आपल्याला पाहायला मिळाले होते. अपराजिता यांनी या मालिकेशिवाय अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या ज्येष्ठ अभिनेते भारत भुषण यांच्या कन्या आहेत. त्यांनी गुप्त, हत्या, मोहरा यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. पण त्यांच्या पतीचे अचानक निधन झाल्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला. त्यांना दोन मुलं असून त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनीच त्यांच्या मुलांचा सांभाळ केला आहे.

अपराजिता यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांच्या करियरला सुरुवात केली होती. त्यांनी रामायण या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते. या ऑडिशनमध्ये रामानंद सागर यांना त्या मंदोदरीच्या भूमिकेसाठी योग्य वाटल्याने त्यांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली की, त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी जवळजवळ ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 

अपराजिता यांनी गुप्त या चित्रपटानंतर कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. त्या सध्या अध्यात्मात रस घेत असून त्या संदर्भात त्या लेखन देखील करतात. 

 

टॅग्स :रामायण