एंटरटेन्मेंट क्वीन राखी सावंत 'बिग बॉस मराठी'च्या घरात आली आहे. 'बिग बॉस मराठी सीझन ६'च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतची एंट्री झाली आहे. नुकताच याचा प्रोमो आला आहे. राखीच्या येण्याने आता घरातलं वातावरण आणखी मजेशीर होणार आहे. आल्या आल्याच तिने घरातील सदस्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. तसंच राखी नागीन अवतारात घरात एन्ट्री घेणार आहे. याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये राखी सावंतची घरात एन्ट्री होते. एंटरटेन्मेंटची लहर, घरात पसरणार राखीचा कहर...यावेळी राखीचा नागीन लूकही मजेशीर आहे. राकेश बापटला बघून राखी म्हणते...राSSकेSSश बाSSप', त्यावर राकेश राखीला 'ताई' म्हणतो. नंतर राखी तन्वीला 'तन्वी कोलते..आता मी तुला सोलते' असं म्हणते. यावर एकच हशा पिकतो. आता राखी घरात कोणाकोणाला भिडणार आणि कोणाशी मैत्री करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राखी सावंत शोबद्दल म्हणाली, "राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तिची मर्जी चालणार आहे मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हाला माझे वेगवेगळे कॉस्च्युम्स, माझा गेम पाहायला मिळणार आहे. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्यांना नाही मिळत आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे. मला खुप अभिमान आहे ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे."
राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ आहे. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. बिग बॉस मराठीच्या घरात राखीची एन्ट्री म्हणजे ड्रामाचं लेव्हल अप! आजपासून बिग बॉसमध्ये मजा येणार हे नक्की.