झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' (Tula Pahte Re) या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री पुर्णिमा डे (Purnima Dey) आता एका नव्या भूमिकेतून पुनरागमन करत आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत ती अधिरा राजवाडेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एक श्रीमंत, आत्मविश्वासू, जिद्दी आणि बिनधास्त मुलगी. विशेष म्हणजे या मालिकेत पुर्णिमा पुन्हा एकदा सुबोध भावेसोबत काम करत असून, यावेळी ती त्याची लाडकी बहीण म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिरा आणि तिच्या भावातील प्रेम, तिचं हट्टी स्वभाव, एक वेगळीच ऊर्जा घेऊन येणारी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी नक्कीच एक नवीन अनुभव ठरणार आहे. पुर्णिमाने आपल्या या नव्या मालिकेबद्दलची उत्सुकता शेअर केली. ती म्हणाली की, "अधिरा राजवाडेला फॅशन डिजायनार बनायचं असतं. ती प्रचंड श्रीमंत आहे आणि तिला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही. ती प्रेमाबद्दल खूप पॅशनेट आहे. तिचं तिच्या पिंट्या दादावर अमाप प्रेम आहे आणि त्याचा ही तिच्यावर जीव आहे. ती संपूर्ण घरात फक्त पिंट्या दादाला मानते. अधिराचा पिंट्या दादा म्हणजे सुबोध भावे (दादा). तिचे बाबा नसल्यामुळे ती दादामध्ये बाबाही पाहते. अधिरा एक जेन झी मुलगी आहे आणि तिचा दादा तिचे सर्व हट्ट पूर्ण करतो. अधिराचे रोहितवर (राज मोरे) खूप जास्त प्रेम आहे आणि त्याच्यासाठी ती काहीही करू शकते. ती खरी, जिद्दी आहे आणि तिला जगाची काही फिकर नाही, तिला पैश्यांचा माज आहे कारण ती खूप श्रीमंतीत वाढली आहे. "
पुर्णिमा पुढे म्हणाली की, "लग्नाच्या प्रोमो शूटला मज्जा आली कारण सर्वजण एकत्र होतो. मला प्रोमोमध्ये अधिरा राजवाडेचा लूक कमाल वाटला. सर्व टीम एकत्र असल्यामुळे गप्पा गोष्टी, स्वादिष्ट खाणं आणि धमाल मस्ती करत आम्ही तो प्रोमो शूट पूर्ण केलं. मी खूप अंतर्मुख व्यक्ती आहे म्हणून मला माझ्या आजूबाजूला असा कोणीतरी हवा आहे जो बहिर्मुखी असेल जेणेकरून ती व्यक्ती माझ्या अंतर्मुख स्वभावामुळे लपलेले माझे व्यक्तिमत्व बाहेर आणेल. सेटवर माझी मैत्री खरंतर सुबोध दादा, चंदू सर , विनायक सर आणि मंदार हे माझे आधी पासूनचे गुरु, मित्र, सहकलाकार, दिग्दर्शक आहेत आणि या लिस्टमध्ये आता नवीन नावं जोडली जाणार आहेत ती म्हणजे तेजू, सुलभा ताई आणि किशोरी ताई. या मालिकेच्या निमित्ताने शर्मिला शिंदेशी ही माझी लगेच मैत्री झाली आमच्या बऱ्याच गोष्टी जुळल्यात. आमचे मेकअप पाऊच आणि बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. राज मोरे जो रोहितची भूमिका साकारत आहे त्याच्याशी ही हळूहळू मैत्री होईलच कारण आमचे बरेच सीन एकत्र होणार आहेत. "