Join us

​पुनित वशिष्ठ आणि हर्ष वशिष्ठचे चंद्रकांता कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 17:09 IST

चंद्रकांता या मालिकेत आपल्याला पुनित वशिष्ठ आणि हर्ष वशिष्ठ हे दोन्ही भाऊ पाहायला मिळणार आहेत. पुनितने कोई अपना सा, ...

चंद्रकांता या मालिकेत आपल्याला पुनित वशिष्ठ आणि हर्ष वशिष्ठ हे दोन्ही भाऊ पाहायला मिळणार आहेत. पुनितने कोई अपना सा, अदालत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने ऑल द बेस्ट, फना, जोश, क्या कहना, ताल यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आता तो चार वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तो प्रेम या पहली-चंद्रकांता या मालिकेत बद्रिनाथ ही भूमिका साकारणार आहे. बद्रिनाथ हा विरेंद्र सिंह म्हणजेच गौरव खन्ना आणि मारिश्च म्हणजेच सुदेश बेरीचा सल्लागार असल्याचे दाखवणयात येणार आहे. चंद्रकांता या नव्वदीच्या दशकात गाजलेल्या मालिकेत बद्रिनाथ ही भूमिका इरफान खानने साकारली होती. इरफानने आज बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. त्यामुळे त्याने साकारलेली भूमिका साकारताना पुनितला चांगलेच दडपण जाणवत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत पुनितचा भाऊ हर्षदेखील काम करत आहे. या मालिकेत तो चंद्रकांता म्हणजेच कृतिका कार्माच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. वशिष्ठ कुटुंबाचा चंद्रकांता या मालिकेसोबत एक विशेष ऋणानुबंध आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण पुनित आणि हर्षच्या वडिलांनी नव्वदीच्या चंद्रकांता या मालिकेत काम केले होते तर हे दोघे भाऊ प्रेम या पहेली-चंद्रकांता या मालिकेचा भाग आहेत. याबाबत पुनित सांगतो, "मी या मालिकेसाठी सध्या विशेष तयारी करत आहे. कारण मूळ चंद्रकांता या मालिकेत बद्रिनाथ ही भूमिका इरफान खान यांनी साकारली होती. त्यामुळे त्यांनी साकारलेली भूमिका साकारणे ही एक जबाबदारी असल्याचे मला वाटते. या मालिकेद्वारे मी चार वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेवर मी प्रचंड मेहनत घेत आहे. ही मालिका आमच्या कुटुंबासाठी विशेष आहे. जुन्या मालिकेत माझ्या वडिलांनी काम केले होते तर आता आम्ही दोघे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहोत."