श्वेता बासू प्रसाद बनली निर्माती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 16:01 IST
श्वेता बासू प्रसादने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. कहानी घर घर की या मालिकेत तिने साकारलेली श्रुती ...
श्वेता बासू प्रसाद बनली निर्माती
श्वेता बासू प्रसादने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. कहानी घर घर की या मालिकेत तिने साकारलेली श्रुती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. कहानी घर घर की या मालिकेच्या लोकप्रियतेनंतर ती ती मोठ्या पडद्याकडे वळली. तिने इक्बाल, मकडी यांसारख्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तिच्या मकडी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळालेला आहे. या चित्रपटानंतर तिने काही काळ दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले. पण नंतरच्या काळात शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ती अभिनयापासून दूर राहिली. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ ती अनुराग कश्यपच्या फँटम या कंपनीत काम करत होती. कॅमेऱ्याच्या मागे कशाप्रकारे काम चालते हे जाणून घेण्यासाठी तिने फँटममध्ये काम केले होते आणि आता अनेक वर्षांनंतर ती अभिनयाकडे वळली आहे. चंद्र-नंदिनी या मालिकेत सध्या ती डबल रोल साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे आणि तिची ही भूमिका सगळ्यांना खूपच आवडत आहे. अभिनयानंतर आता तिने निर्मितीक्षेत्राकडे वळण्याचे ठरवले आहे. एका लघुपटाच्या निर्मितीद्वारे ती निर्मितीक्षेत्रात पदार्पण करणार आहे. रुट्स असे तिच्या लघुपटाचे नाव असून मुलाखतींवर आधारित हा लघुपट आहे. या लघुपटाविषयी श्वेता सांगते, "भारतीय संगीताचा होत असलेला ऱ्हास याच्यावर आधरित अनेकांची मुलाखत असे या डॉक्युमेंट्रीचे स्वरूप आहे. यात प्रेक्षकांना अनेक दिग्गजांच्या मुलाखती पाहायला मिळणार आहेत. मला लहानपणापासूनच भारतीय संगीताविषयी खूप प्रेम आहे. तसेच या विषयावर खूप उत्सुकतादेखील आहे. हा विषय माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असल्याने मी या लघुपटाची निर्मिती करण्याचे ठरवले आहे."