Priya Marathe Last Rites: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) आज पहाटे कर्करोगाने निधन झालं. तिच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रियाचं असं अचानक जाणं अनेकांना चटका लावणारं होतं. काही वेळापूर्वीच मीरा रोड येथील हिंदू स्मशानभूमीत प्रियाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. प्रियाला निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले.
प्रिया मराठे अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत होती. एकापेक्षा एक मालिकांमध्ये तिच्या भूमिका गाजल्या. आज तिला अखेरचा निरोप देताना सहकलाकारांना अश्रू अनावर झाले. 'पवित्र रिश्ता'मध्ये तिच्या बहिणीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रियाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होती. प्रार्थनाचे अश्रू थांबत नव्हते. याशिवाय 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत प्रिया शेवटची दिसलीय. तिचा सहकलाकार अभिनेता अभिजीत खांडकेकरही अंत्यदर्शनासाठी आला होता. शाल्मळी टोळ्ये, अभिजीत केळकर, आस्ताद काळे, स्वप्नाली पाटील, विजू माने, शर्मिष्ठा राऊत, ओमप्रकाश शिंदेसह अनेक कलाकारांनी प्रियाच्या अंत्यदर्शनाला हजेरी लावली. प्रत्येक जण तिच्या आठवणीत भावुक झाला. 'सेलिब्रिटी प्रमोटर' इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
दिसायला सुंदर, पडद्यावर साकारली खलनायिका; असा होता प्रिया मराठेचा कलाविश्वातील प्रवास
प्रिया मराठेचं निधन सर्वांनाच चटका लावून गेलं. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरने गाठलं होतं. त्यातून ती बरी झाली होती आणि पुन्हा कामही करत होती. मात्र काही महिन्यांपासून तिला पुन्हा त्रास सुरु झाला. यावेळी मात्र ती या आजारावर मात करु शकली नाही. तिच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं होतं. अखेर आज ३१ ऑगस्ट रोजी रविवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली. प्रियाच्या पश्चात पती शंतनू मोघे आहे. प्रियाच्या निधनानंतर शंतनू आणि कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.