'प्रेमाची गोष्ट' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील मुक्ता-सागरची जोडी प्रेक्षकांना आवडते. 'प्रेमाची गोष्ट'मध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत आहे. स्वरदाच्या गाडीचा अपघात झाला आहे. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. शूटिंगवरुन घरी परतत असताना स्वरदाच्या गाडीचा अपघात झाला आहे.
स्वरदाने नेमका अपघात कसा झाला ते सांगितलं आहे. या अपघातात सुदैवाने अभिनेत्रीला कोणतीही दुखापत झालेली नाही. स्वरदाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती म्हणते, "आता ६ वाजलेत...पहाटे सकाळी ५.३० वाजता माझ्यासोबत हा किस्सा झालाय. गाडीची अख्खी हेडलाइट गेलीये, चाक गेलंय. गाडीचं दार आतमध्ये घुसलंय त्यामुळे ते ओपन होत नाहीये. गाडीची एक बाजू डॅमेज झालीये. काल सकाळी ७ ते १०ची शिफ्ट होती. काल सकाळी ७च्या शिफ्टला काम सुरू केलंय. ते आज सकाळी ५ वाजता माझं पॅकअप झालंय. त्यानंतर मी एकटी ही गाडी ड्राइव्ह करून घेऊन आले. आणि मला झोप लागली. कारण मी प्रचंड थकले होते".
"सकाळी ७ वाजल्यापासून शूट करत होतो ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ पर्यंत. त्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालंय. हा महासंगम आणि हे शूट मला खूप महागात पडलाय. आता हा कितीचा फटका बसेल त्याची कल्पना नाही. पण, सुदैवाने माझ्या जीवावर बेतलं नाही. झोप लागल्यामुळे गाडी कुठेतरी जोरात धडकली नाही आणि त्यामुळे मोठा अपघात झाला नाही. एवढंच काय ते मला बरं वाटतंय. मला सहकलाकारांना विनंती आहे की तुम्ही असं नका करू. यातून तुम्ही पण शिका आणि तुमच्या जीवाशी खेळू नका. काम होत राहील पण जीव महत्त्वाचा आहे, हे एवढंच मला सांगायचंय", असं म्हणत स्वरदाने घडलेला प्रकार सांगितला आहे.