महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. सर्वांच्या आवडत्या 'फुलवंती'ला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इंडस्ट्रीतील कलाकारांनीही प्राजक्तासाठी खास स्टोरी पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची यात्रा सुरु केली होती. आज वाढदिवशी भीमाशंकरचं दर्शन घेऊन तिची ही यात्रा पूर्ण झाली आहे. फोटो शेअर करत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
प्राजक्ता माळीचा आजचा वाढदिवस खास आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर देवस्थान येथे जाऊन प्राजक्ताने दर्शन घेतलं. कुटुंबासोबत ती आज भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. प्राजक्ताने मंदिरातील काही फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये ती शंकराच्या पिंडीवर तीर्थ अर्पण करताना दिसत आहे. तसंच मनोभावे पूजाही करत आहे. प्राजक्तासोबत तिची आई, दोन भाच्या, वहिनी दिसत आहे. या फोटोंसोबत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले, "भीमा शंकर ज्योतिर्लिंग- पुणे- महाराष्ट्र. आणि अशा प्रकारे आज वाढदिवसाचं औचित्य साधून, भीमा नदीच्या काठी, निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या 'भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे' सहकुटुंब दर्शन घेऊन १२ ज्योतिर्लिंग यात्रा पुर्ण केली."
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता केदारनाथालाही जाऊन आली. तिच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकरही होती. दोघींनी सोबतच केदारनाथची यात्रा पूर्ण केली. तसंच बद्रीनाथचंही दर्शन घेतलं. आता भीमाशंकरच्या दर्शनाने प्राजक्ताच्या १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण झाली आहे.
प्राजक्ताला नुकताच 'फुलवंती' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मराठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.