Join us

प्राजक्ता माळीने योगदिनानिमित्त घातले १०८ सूर्यनमस्कार, पुरावाही दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:17 IST

आज सकाळी 7 ते 8.15 दरम्यान प्राजक्ताने १०८ सूर्यनमस्कार पूर्ण केले याचा लाईव्ह व्हिडिओच तिने पोस्ट केला आहे.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं (Prajakta Mali) फिटनेसबाबतीत प्रचंड जागरुक आहे. जिम वगरे न करता ती रोज योगा करते. योगा करण्याचे फायदे अनेकदा ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day) प्राजक्ताने १०८ सूर्यनमस्कार घातले आहेत. इतकंच नाही तर तिने चाहत्यांना त्याचा पुरावाही दाखवलाय. 

योगदिनानिमित्त प्राजक्ताने कालच चाहत्यांना १०८ सूर्यनमस्कार करण्याचं आव्हान दिलं होतं. आज सकाळी 7 ते 8.15 दरम्यान प्राजक्ताने १०८ सूर्यनमस्कार पूर्ण केले. ३६ सूर्यनमस्कारांचे ३ सेट करत तिने १०८ आकडा गाठला. तसंच प्रत्येक सेटनंतर तिने पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला तर तेव्हाच चाहत्यांशी संवादही साधला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. कोणताही व्यायाम करताना एसी, फॅन नसावा. खिडक्या उघड्या ठेवून नॅचरल हवा खेळती राहावी असा सल्लाही तिने या लाईव्हच्या माध्यमातून दिला. प्राजक्ताने तिच्या घरातच सूर्यनमस्कार घातले. 

याचा पुरावा म्हणजे प्राजक्ताने सकाळी ७ वाजल्यापासून इन्स्टाग्राम लाईव्ह सुरु असतानाच १०८ सूर्यनमस्कार पूर्ण केले. यावेळी अनेक चाहतेही तिच्यासोबत सूर्यनमस्कार घालत होते. इन्स्टाग्राम लाईव्हचा पूर्ण व्हिडिओ प्राजक्ताने पोस्ट केला आहे. 

'सालाबादप्रमाणे यंदाचेही वर्षी १०८ सूर्यनमस्कार घातले. हा घ्या पुरावा. योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा नाहीत.' असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. प्राजक्ताच्या या लाईव्हला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला. योगदिनाला यापेक्षा चांगला उपक्रम तो काय असाच संदेश तिने या माध्यमातून दिला.

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे. यातून ती आणखी लोकप्रिय झाली आहे. याशिवाय तिने 'प्राजक्तराज' हा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे.यामाध्यमातून की म्हाळसा, सोनसळा सारखे पारंपारिक दागिन्यांना प्रमोट करत आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीयोगासने प्रकार व फायदेआंतरराष्ट्रीय योग दिनमराठी अभिनेता