अभिनेत्री प्राची पिसाटने सुदेश म्हशिलकर यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. सुदेश यांनी माफी मागावी असं प्राचीने म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर सुदेश यांनी मौन बाळगणं पसंत केलं होतं. अखेर ५ दिवसांनी आपली बाजू मांडत सुदेश म्हशिलकर यांनी पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी प्राचीसोबत चॅटचा स्क्रीनशॉटही टाकला होता. प्राचीला मेसेज माझ्याच अकाऊंटवरुन गेला पण ते अकाऊंट हॅक झालं होतं, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. यावर आता प्राचीने उत्तर दिलं आहे.
सुदेश म्हशिलकर यांच्या पोस्टनंतर प्राचीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते, "मुद्दा काय तुम्ही बोलता काय? नक्की माझा नंबर सेव्ह होता की नव्हता? FB अकाऊंटचा अॅक्सेस होता. अकाऊंट हॅक झाल्यानंतर गप्प का बसलात? चॅटमध्येच मेसेजच्या खाली मेसेज का नाही केला अकाऊंट हॅक झालेला असा?".
सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीला "आजकाल खूपच सेक्सी दिसायला लागलीस", असा मेसेज केल्यानंतर अभिनेत्रीने त्यांना हसण्याचे इमोजी रिप्लाय म्हणून पाठवले होते. याचा स्क्रीनशॉट सुदेश यांनी शेअर केला होता. त्यावरही प्राचीने उत्तर दिलं आहे. "राहिला प्रश्न स्माइल इमोजीचा तर ५०-६० वर्षाच्या माणसाचा अपमान करण्याऐवजी वयाचा मान ठेवून प्रत्येक मुलगी पहिल्यांदा स्माइल इमोजी पाठवून दुर्लक्ष करते. आणि आदरपूर्वक टॉपिक संपवते. दुसऱ्यांदा थंब इमोजीने दुर्लक्ष करते मीदेखील तेच केलं. तरीही मेसेज नाही थांबलं तर तिसऱ्यांदा एकदाच उत्तर देते आणि मॅटर संपवते...मीही तेच केलं...अजूनही वेळ गेलेली नाही...माफी मागा आणि विषय संपवा", असं प्राचीने म्हटलं आहे.