Join us

नीरा बॅनर्जीला साकारायची आहे 'ही' भूमिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 07:15 IST

भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची क्षमता दृष्टीमध्ये असते; तर त्यात बदल घडवून आणण्याची शक्ती दिव्यामध्ये असते.

छोट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘दिव्य दृष्टी’. या मालिकेत अतिमानवी शक्ती लाभलेल्या दोन बहिणींची कथा सादर करण्यात आली आहे. भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची क्षमता दृष्टीमध्ये असते; तर त्यात बदल घडवून आणण्याची शक्ती दिव्यामध्ये असते.

नीरा बॅनर्जी ही अभिनेत्री यात दिव्याची भूमिका साकारत आहे. आपण टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात कसे आलो, त्याची कथा तिने नुकतीच सांगितली आणि आपल्या स्वप्नातील भूमिका अद्याप आपल्याला साकारायला मिळाली नाही, याची खंतही तिने व्यक्त केली.

नीरा बॅनर्जी म्हणाली, “मी कायद्याचा अभ्यास करत होते आणि अभिनय क्षेत्राचा करिअर म्हणून मी कधी विचारही केला नव्हता. माझे वडील नौदलात होते आणि त्यांना तिथे समर्पित वृत्तीनं काम करताना पाहूनच मी लहानाची मोठी झाले होते. त्यामुळे आपणही नौदलात अधिकारी व्हावं, अशी माझी इच्छा होती. नंतर मी माझ्या आईकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आणि तेव्हा काही कार्यक्रमही केले होते. 

अशाच एका कार्यक्रमात एका दिग्दर्शकाने मला पाहिलं आणि मला एक भूमिका देऊ केली. ती साकारताना मला जाणवलं की आपण उत्तम अभिनय करू शकतो आणि आपल्याला भविष्यात हेच करायचं आहे. त्यानंतर मी कधीच मागे वळून बघितलं नाही. पण यामुळे नौदल अधिकारी होण्याचं माझं स्वप्न संपुष्टात आलं. म्हणूनच आता मला निदान नौदल अधिकार्‍्याची भूमिका साकारून तरी त्या कामाचा अनुभव घेण्याची इच्छा आहे.” या मालिकेत नीरा आपली भूमिका चोख सादर करत असून आगामी भागांमध्ये रसिकांना काही रंजक कथाभाग पाहायला मिळणार आहे.