Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे...! संगीता घोषला ह्या भूमिकेसाठी परिधान करते १० किलो वजनाचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 07:15 IST

'दिव्य दृष्टी' या मालिकेने प्रेक्षकांना आपल्या कथानकाने चांगलीच भुरळ पाडली आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी' या मालिकेने प्रेक्षकांना आपल्या कथानकाने चांगलीच भुरळ पाडली आहे. निर्मात्यांनी ही मालिका जास्तीत जास्त परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून त्यातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले आहे. या मालिकेत पिशाचिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संगीता घोषने आपल्या मोहक रूपाने प्रेक्षकांचे लक्ष जरी वेधून घेतले असले, तरी तिच्या संवादांनी प्रेक्षकांच्या अंगावर भीतीचा शहाराही उमटतो. पण तिच्या रूपात सर्वाधिक लक्षवेधक जर कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे तिचे दागिने.

ऑक्सिडाइज्ड चांदीच्या दागिन्यांनी मढलेली आणि हातात कोपरापर्यंत बांगड्या घातलेली पिशाचिनीने असे नावीन्यपूर्ण रूप प्रथमच टीव्हीच्या पडद्यावर संगीताने साकारले आहे.

या लूकवर संगीता खूप खूश असून ती सांगते की, 'पिशाचिनीचे रूप हे आधुनिक आणि शैलीदार असून अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिच्या स्वभावा व्यतिरिक्त तिचे रूप खरेच आकर्षक आहे. मी पिशाचिनीची भूमिका प्रथमच साकारीत असून पडद्यावर इतके सारे आणि जड दागिने घालण्याचीही माझी ही पहिलीच वेळ आहे. पिशाचिनीचे कपडेही भरपूर असून तिला सर्वांगावर दागिनेही घालायचे असतात. त्यामुळे मला तिच्या अवतारात शिरण्यासाठी तब्बल तीन तास लागतात.'

संगीता पुढे म्हणाली की, 'माझे दागिनेही काही वेगळेच असून त्या सर्वांचे वजन चक्क दहा किलो इतके आहे. त्यात माथापट्टी, दोन्ही दंडांवरील बाजूबंद आणि मोराच्या आकाराची नथ या दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय तीन पदरी कंबरपट्टा आणि सोनेरी बटवा हेही मला अंगावर घालायला लागते. हे तर निव्वळ माझे अर्धे दागिने झाले.

माझ्या शरीरावर इतके दागिने आहेत की माझ्या नखांसाठीही काही दागिने आहेत. पिशाचिनीची भूमिका रंगविणे हे एक आव्हान असले, तरी मला हा अवतार आणि व्यक्तिरेखा खूपच आवडते. मला या रूपात पाहणे प्रेक्षकांनाही आवडत असेल, अशी आशा असल्याचे संगीता सांगते.

टॅग्स :दिव्य दृष्टीसंगीता घोष