अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती सध्या झी मराठी वाहिनीवरील 'पारू' (Paaru Serial) या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती पारूच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे. या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. दरम्यान आता तिच्या फिटनेसचे सीक्रेट समोर आले आहे.
शरयू सोनावणे म्हणाली की,"मी जास्त करून हलकं -फुलकं आणि सहजपणे पचेल असाच आहार घेते. मी सकाळी उठल्यावर भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाते. त्यानंतर जिरापाणी किंवा नारळपाणी पिते. मग सेटवर येऊन पोहे, उपीट, इडली किंवा ऑम्लेट ब्रेड असा काहीतरी ब्रेकफास्ट करते. त्यानंतर एखादं फळ जसे संत्र, सफरचंद, टरबूज, कलिंगड किंवा किवी. सकाळचा नाष्टा झाल्यानंतर मधल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते १२:३० मध्ये सलाड खाते आणि त्यानंतर मी सरळ दुपारी जेवते. दुपारच्या जेवणात एक भाकरी आणि कुठलीही भाजी त्याच्या जोडीला दही. कधी फारच मन केले तर डाळ खिचडीमध्ये इंद्रायणी भात खाते. लंचनंतर सूर्यास्तापर्यंत मखाना, चणे - शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू खाते आणि यासोबत माझं दिवसभराचं खाणं संपते. आधी मी संध्याकाळी ७ वाजता लास्ट मिल करायचे. आता दुपारी जेवण झाल्यानंतर पौष्टिक आणि हलके स्नॅक्स घेते. कारण सूर्यास्त झाला की आपली पाचन शक्ती मंद होते.
ती पुढे म्हणाली की, मी दिवसभरात २.५ ते ३ लिटर पाणी पिते आणि उन्हाळ्यात ताक आणि सब्जाचे पाणी घेते. शक्यतो घरचंच खाल्ले पाहिजे कधीतरी बाहेरचे खाऊ शकतो. जसे मी जेव्हा घरी सुट्टीसाठी जाते तेव्हा माझ्या मनाला येईल ते मी खाते. पण पुन्हा पारूच्या सेटवर आले की नेहेमीचा नित्यक्रम पाळते. जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही आपले काम चांगल्या प्रकारे करू शकता."