प्रत्येक आठवड्याला नवीन ट्विस्ट्स घेऊन येणारी पारू मालिका (Paru Serial) सध्या एका हृदयस्पर्शी वळणावर आहे. पारू अनेक अडचणी, विरोध, आणि नात्यांच्या चाचण्यांमधून मार्ग काढत इथवर आली आहे. पण आता तिच्या या संघर्षाला अखेर गोड फळं मिळू लागली आहेत. कधी सावध पावलांनी, तर कधी हिम्मत दाखवत प्रत्येक अडथळ्याचा सामना करणाऱ्या पारूला आता तिच्या नात्यांना घरात जागा मिळताना दिसत आहे. आदित्यसोबतचं तिचं गुपित उलगडलं असतानाही, कुटुंबाची साथ, वडिलांचं स्वीकार, आणि आदित्यच्या प्रेमातली दृढता या सगळ्यामुळे तिच्या जीवनात आता आनंदाची पहाट उमटू लागली आहे.
आदित्य आणि पारूच्या नात्याचा खुलासा झाला असून, त्यांच्या गुप्त विवाहाची बातमी अखेर किर्लोस्कर कुटुंबासमोर उघड झाली आहे. अहिल्या आदित्यच्या भविष्यासाठी काळजी करत असताना त्याला योग्य निर्णय घेण्याची सतत आठवण करून देते. दुसरीकडे, आदित्य आणि पारू गुपचूप संसाराचा आनंद घेत असताना, त्यांचे हळवे क्षण आणि एकमेकांतली आपुलकी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जेव्हा श्रीकांत पारूला चुडा भेट देतो आणि तिला सून म्हणून संबोधतो. त्याचा हा निःशब्द स्वीकार ही एक सशक्त भावना ठरते. मात्र हे पाहून दिशा गोंधळ घालणार आहे. यावेळी किर्लोस्कर कुटुंब एकत्र येत कबूल करतात की त्यांना आधीपासूनच आदित्य पारूचं गुपित माहित होतं. या धक्क्याने दिशा गप्प होते. या बदललेल्या वागणुकीमुळे दिशा मानसिकदृष्ट्या अडचणीत सापडणार आहे.