प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीस आलेली शेफाली जरीवालाचं काही दिवसांपूर्वी वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्या अकाली निधनामुळे संपूर्ण टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. शेफालीचा पती आणि अभिनेता पराग त्यागी या घटनेमुळे पूर्णपणे खचला आहे. अशातच शेफालीच्या जाण्यानंतर यंदा गणेशोत्सव साजरा करणार का, असं विचारताच परागने भावुक प्रतिक्रिया दिली आहे.
पराग त्यागीची भावूक प्रतिक्रिया
दरवर्षी गणेशोत्सवात शेफाली आणि पराग आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणत असत. या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पराग मंगळवारी मुंबईतील एका ठिकाणी मीडियाला दिसला. तेव्हा पापाराझींनी त्याला ‘या वर्षी गणपती आणणार का?’ असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकल्यावर परागने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि तो शांतपणे आपल्या गाडीकडे निघून गेला. गाडीत बसल्यावर, त्याने हात जोडून आणि हसून पापाराझींना अभिवादन केले. परागच्या या प्रतिक्रियेमुळे त्याच्या मनातील दुःख स्पष्टपणे दिसून आलं.
पॅपाराझींवर सोशल मीडियावर टीका
परागच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर पापाराझींवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. ‘एवढ्या मोठ्या दुःखात असलेल्या व्यक्तीला असा प्रश्न विचारणे चुकीचं आणि असंवेदनशील आहे’, असं अनेक युजर्सनी म्हटले आहे. काही युजर्सनी पापाराझींना सेलिब्रिटींसाठी अधिक संवेदनशील होण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर शेफाली आणि परागचा गेल्या वर्षीचा गणेश चतुर्थीचा व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यात ते दोघे मिळून आनंदाने गणपती बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना शेफालीची आठवण आली.