Join us

प्रेम हेमध्ये झळकणार पल्लवी पाटील आणि सिद्धार्थ मेनन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 10:49 IST

आपण आयुष्यात नेहमी काहीतरी शोधत असतो आणि ते शोधण्याच्या नादात आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते. प्रेम हेची नवी गोष्ट ...

आपण आयुष्यात नेहमी काहीतरी शोधत असतो आणि ते शोधण्याच्या नादात आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते. प्रेम हेची नवी गोष्ट मन बावरे ही आहे. गार्गी आणि आदित्यची प्रेमकथा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या गार्गी आणि आदित्यची ही गोष्ट असून गार्गी एक अतिशय सुंदर छान स्वभावाची मुलगी आहे. लहानपणापासूनच गार्गी चाळीतील सर्वच कार्यक्रमात भाग घेणारी, सर्वांची आवडती तर आदित्य हा तसा शांत मुलगा. लहानपणापासूनच त्याला गार्गी आवडायची. पण त्याला कधीच ते व्यक्त करता आले नाही. जसे ते दोघे मोठे होत गेले तसे ते प्रेम अव्यक्तच राहिले. नंतर आदित्य शिक्षणासाठी मुंबईबाहेर गेला आणि जेव्हा आला तेव्हा सगळेच बदललेले होते. लोकांची गार्गीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता. एक वाया गेलेली मुलगी म्हणून तिला लोक ओळखायला लागले होते. त्यामुळे आदित्यला काहीच समजत नव्हते. पण हे नक्की का घडले आणि कशामुळे घडले हे न समजल्यामुळे शेवटी आदित्यने याबाबत गार्गीला विचारले.  पण गार्गीने त्याला याबाबत काहीच कळू दिले नाही. अशी ही दोघांची एका वेगळ्याच वळणावरील लव्हस्टोरी पूर्ण होते का? की अर्धवटच राहते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. गार्गीच्या आयुष्यात काय घडलेले असते हे कळल्यावर तर प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. मन बावरेमध्ये पल्लवी पाटील आणि सिद्धार्थ मेनन हे मुख्य भूमिकेत असून ही कथा गणेश पंडित यांनी लिहिली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन भरत गायकवाड यांनी केले आहे. भरत यांनी यापूर्वी भो भो सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.