छोट्या पडद्यावरील अभिनेता कुशल बद्रिके 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला आणि लोकप्रिय झाला. विनोदाचे अचूक टायमिंग साधत त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. अभिनयासोबतच कुशल सोशल मीडियावरही सक्रीय असून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. तसेच कधी कधी त्याच्या पोस्ट मजेशीरदेखील असतात. दरम्यान त्याने अभिनेत्री आणि नृत्यांगणा सुकन्या काळण हिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री आणि नृत्यांगणा सुकन्या काळण हिने नुकतेच रोशन माररसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने महाराष्ट्रीयन आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले आहे. तिच्या लग्नाला कुशल बद्रिकेने हजेरी लावली होती. त्याने लग्नातला फोटो शेअर करत मजेशीर पोस्ट लिहिली आहे. कुशलने फोटो शेअर करत लिहिले की, झालं बाबा लग्न एकदाचं ह्या पोरीच, सगळं मनासारखं करून घेतलं हिने , कपडे-लत्ते, दाग-दागिने, नट्टा-पट्टा , हळद-बिळद, संगित-बिंगीत. स्वतःच अख्ख कुटुंब, नवऱ्याचं अख्ख कुटुंब , सगळे मित्र मैत्रिणी सगळ्यांना कामाला लावलं बाबा हिने.
कुशलने पुढे म्हटले की, किती छान लग्न झालं ग तुझं, कुठेही बडेजाव पणा नाही की उगाच श्रीमंतीचा भपका नाही , मुळात हे लग्न खरचं लग्ना सारखं वाटलं एखाद्या event सारखं वाटलं नाही . त्या बद्दल तुझे आणि रोशन चे आभार. खूप सुखी रहा. खूप आनंदी रहा. आणि आता तुला हक्काचा नवरा मिळाला आहे तेंव्हा मित्रांना धमक्या देणं बंद कर आणि आयुष्याचा सगळा राग ह्या माणसावर काढ. त्यासाठी आमचा पिच्छा सोड. तुम्हा दोघांना खूप प्रेम.