श्रेया बुगडे (Shreya Bugde) मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती पुन्हा एकदा चला हवा येऊ द्या कार्यक्रमात दिसणार आहे. नुकतेच तिने या कार्यक्रमाच्या सेटवरील फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे.
श्रेया बुगडे हिने चला हवा येऊ द्या- कॉमेडीचं गँगवार कार्यक्रमाच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, ''हवा येऊ द्याचं नवीन पर्व येणार असं कळताच सगळीकडे खूप उत्सुकतेचे वातावरण आहे. हवा यऊ द्याचं पाहिलं पर्व २०१४-२०२४ असं तब्बल १० वर्ष सुरु होतं. लेखक, दिग्दर्शक, सगळे कलाकार, तंत्रज्ञ ,पद्यामागे काम करणारे कलाकार आणि आमची चॅनेलची सगळी टीम ह्यांनी आमच्या जीवाची परकाष्ठा करून पण अत्यंत आनंदाने ह्या कार्यक्रमात काम केलं. माय बाप प्रेक्षकांनी सुद्धा आमच्यावर जीव ओतून प्रेम केलं. हवा येऊ द्या जेव्हा २०१४ साली सुरु झालं तेव्हा तो सुद्धा एक नवीन कार्यक्रम होता. त्या आधी मराठी टीव्हीवर कधीच असा कार्यक्रम झाला नव्हता. सगळेच चाचपडत होतो. प्रेक्षकांनी पण सुरुवातीला थोडा वेळ घेतला आणि मग भाग दर भाग आम्ही त्यांच्या घरातच नही तर त्यांच्या, मनात सुद्धा कायमचं 'घर' केलं. तेव्हा सुद्धा आम्ही कधी चुकलो तर वेळोवेळी तुम्ही कान पकडले आणि तशीच कायम शाब्बासकीची थाप सुद्धा दिलीत.''
तिने पुढे म्हटले की, ''आता हवा येऊ द्याचे नवीन पर्व नाही तर नवा अध्याय सुरु होतोय. ह्या वेळी पण तीच मेहेनत घ्याची तयारी आहे. मनामध्ये सुद्धा तोच, तुम्हा प्रेक्षकांना न दुखवता फक्त तुमचं मनोरंजन करण्याचा हेतू आहे. आणि ह्यावेळी ह्यात काही नवीन -जुने सावंगडी घेऊन तुम्हाला हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. त्याच बरोबर महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून निवडून आणलेले काही नव्या विनोदाची शैली आणि नवीन उम्मेद घेऊन आलेले तरुण सुद्धा त्यांना मिळालेल्या ह्या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या ही डोळ्यात तीच स्वप्न आहेत जी आमच्या होती. माझी खात्री आहे की ह्या सगळ्या आमच्या पोरांना आणि आम्हाला सुद्धा तुम्ही तेच प्रेम आणि आशीर्वाद द्याल जे इतकी वर्ष देत आलात!! फक्त ह्या वेळी कार्यक्रम पाहताना ‘आपला आवडता कार्यक्रम परत आलाय...’ ह्या एकाच भावनेनं बघा. बस्स! ह्या नवीन पर्वाला पण तुम्ही तेवढच प्रेम द्याल हीच देवाचरणी आणि तुमच्या पुढे प्रार्थना. भेटूच. खूप प्रेम.''