Join us

"नॉनस्टॉप २४ तास शूटिंग", थाटात पार पडला तेजा-वैदहीचा विवाह सोहळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 19:05 IST

Tuzyasathi Tuzyasanga Serial : 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत नुकतेच तेजा-वैदहीचं लग्न पार पडणार आहे.

'सन मराठी'वरील 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' (Tuzyasathi Tuzyasanga Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आवडली. मालिकेत नुकतेच तेजा-वैदहीचं लग्न पार पडणार आहे. मालिकेच्या कथानकानुसार तेजाचा प्लॅन फसतो व तेजा चुकून वैदहीला किडन्याप करतो. ही गोष्ट सर्वत्र पसरते. यामुळे तेजा-वैदहीच्या आयुष्याला नवं वळण मिळतं. 

वैदहीचं नाव ऐकलं तरी माईसाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. पण आपल्या राजकीय कारकिर्दीवर काही गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांना तेजाचं लग्न वैदही सोबत लावून द्यायला लागत आहे. या लग्नात प्रत्येक व्यक्तीचा स्वार्थ दडलेला आहे पण तेजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पहिल्या नजरते जिच्या प्रेमात पडला आणि आता तिच्याबरोबरच त्याच लग्न होत आहे. आता खऱ्या अर्थाने मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. वैदहीला तेजाचा प्रचंड राग असताना  तिच्या बहिणीसाठी ती लग्नाला तयार होते. पण आता जेव्हा वैदही मक्तेदारांची सून म्हणून तेजाच्या घरी जाणार  तेव्हा तिला बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागेल. माईसाहेब वैदहीचा छळ करण्याचा प्रयत्न करणार पण वैदही त्यांना सडेतोड उत्तर देऊ शकेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

या लग्नाबद्दल वैदही म्हणजेच अभिनेत्री अनुष्का गीते म्हणाली की, "नुकताच तेजा-वैदहीच्या लग्नाचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. लग्नातही ट्विस्ट असणार आहे. या लग्नामुळे मला सामूहिक विवाह सोहळ्याचा भन्नाट अनुभव  मिळाला. त्यामुळे लग्न सोहळ्याचं शूटिंग करताना आजूबाजूला ४०-५० जोडपे नटून थटून होते. अगदी २ दिवसात आम्ही लग्नाचं शूट पूर्ण केलं. नॉनस्टॉप २४ तासांचं शूटिंग, सगळ्यांचे थकलेले चेहरे पण कोणीही कामाचा कंटाळा न करता शूटिंग केलं. कलाकार असो किंवा पडद्यामागच्या मंडळी आम्ही सगळेच एकमेकांची काळजी घेत होतो. माझा लग्नातील लूक अगदीच जोधा सारखा आहे. त्यामुळे हे लग्न मी खूप एन्जॉय केलं. आता लग्नानंतर वैदहीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुळात स्नेहलता, सीमा ताई यांच्याबरोबर जास्त सीन करायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना तेजा- वैदहीच्या प्रेमाची गोष्ट नक्की आवडेल. आता मालिका रंजक वळणावर आली आहे."