'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण कदाचित या पर्वात हसताय ना हसायलाच पाहिजे हे आता ऐकू येणार नाही. कारण, 'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन करणारा निलेश साबळे यंदाच्या पर्वात दिसणार नाहीये. निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेच्या जागी आता अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. याबाबत निलेश साबळेने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिजीत खांडकेकरबद्दल काय म्हणाला निलेश साबळे?
"चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वात अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करतोय हे मला माहित आहे. आमची खूप उत्तम मैत्री आहे, ती कायम राहील. अभिजीत माझ्याहीपेक्षा उत्तम सूत्रसंचालन करतो त्यामुळे त्याला आणि टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा. हा कार्यक्रम माझ्या कायम हृदयात राहील", असं निलेश साबळे म्हणाला.
का सोडला 'चला हवा येऊ द्या' शो?
"माझ्या काही अडचणी होत्या, मी सध्या एक सिनेमा करतोय त्यात अडकलोय. त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे. त्यामुळे माझ्या तारखा जुळल्या नाहीत. याशिवाय यामागे अनेक विविध कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून मी माघार घेतो आहे. याचा अर्थ असा होत नाही की, मला कार्यक्रम करायचा नव्हता किंवा मी नकार दिला. मी स्वत:हून कार्यक्रमातून माघार घेतलीये कारण, सध्या इतर कामे आहेत. हेच कारण भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे. ते माझ्याच सिनेमात माझ्याबरोबर काम करत आहेत. ते सुद्धा या कार्यक्रमात नसतील. आम्ही कार्यक्रमात नसण्याचे हे एकमेव कारण आहे".