निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हे नाव आता मराठी प्रेक्षकांच्याही ओळखीचं झालं आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे तिला कमालीची लोकप्रियता मिळाली. बोल्ड, बिंधास्त अशी निक्की अनेकांना आवडली. निक्कीने त्याआधी हिंदी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. तिथे तिची राखी सावंतसोबत चांगलीच भांडणं झाली होती. हिंदीत काम करुनही तिला म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं. हिंदी बिग बॉसनंतर उलट तिला रिजेक्शनचाच सामना करावा लागल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत निक्की तांबोळी म्हणाली, "बिग बॉस हिंदीनंतर मला सर्वात जास्त रिजेक्शनचा सामना करावा लागला. बहुदा ते माझ्या नशिबातच होतं. मला जितक्या संधी मिळाल्या त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त रिजेक्शन मिळाले आहेत. पण मी कधीच याचा फारसा विचार केला नाही. रिकाम्या वेळेत या सर्व गोष्टींचा विचार करुन नैराश्यात जाण्यापेक्षा मी इतर गोष्टी केल्या. मी कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवला, पेट डॉगसोबत खेळले, आई बाबा नसतील तर सतत त्यांच्याशी फोनवरुन संपर्कात राहिले. काही कामासंबंधी मीटिंग अटेंड केल्या. जिम, योगा केलं. त्यामुळे मी कधीच रिजेक्शनचा फारसा परिणाम होऊ दिला नाही."
निक्की तांबोळी नुकतीच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये झळकली. यामध्ये तिने अप्रतिम पाककौशल्य दाखवलं. यामध्ये ती अगदी फिनालेपर्यंतही पोहोचली होती. विकास खन्ना, रणवीर ब्रार या शेफने तिचं कौतुकही केलं होतं. तर आता निक्की 'शिट्टी वाजली रे' या मराठी रिएलिटी शोमध्ये दिसत आहे. हा शो 'लाफ्टर शेफ'सारखाच आहे.