Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ती स्वत:ला मोठी स्टार समजते", उषा नाडकर्णींच्या वक्तव्यानंतर निक्की तांबोळीने दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:13 IST

ती फार मोठी स्टार आहे आणि मी काही मोठ्या लोकांशी बोलायला जात नाही अशी उषा नाडकर्णींनी उपरोधिकपणे टिप्पणी केली होती. त्यावर निक्की काय म्हणाली वाचा

'बिग बॉस मराठी ५' मुळे प्रसिद्धीझोतात आलेली निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) नुकताच वाढदिवस साजरा केला. बॉयफ्रेंड अरबाज पटेलसोबत तिने सेलिब्रेशन केलं. बिग बॉसनंतर निक्की मास्टरशेफमध्येही सहभागी झाली होती. या शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीही होत्या. नुकतंच एका मुलाखतीत उषा नाडकर्णींना (Usha Nadkarni) निक्की तांबोळी कशी आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी तिचा पाणउताराच केला.  ती फार मोठी स्टार आहे आणि मी काही मोठ्या लोकांशी बोलायला जात नाही असं त्यांनी उपरोधिकपणे टिप्पणी केली. उषा नाडकर्णींचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. निक्कीपर्यंतही तो पोहोचला. आता निक्कीने त्यावर मुलाखत घेणाऱ्याला आणि उषा नाडकर्णींनाही सडेतोड उत्तर दिलं.

निक्की आधी इन्स्टाग्राम स्टोरीवर त्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "मी जास्त कोणामध्ये मिसळत नाही कारण मी इंट्रोव्हर्ट आहे. कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यात मला काडीचाही रस नाही. प्रत्येक गोष्टीला गर्व किंवा नकारात्मक कमेंट्सशी जोडू नका. तुम्ही शिकलेले आहात त्यामुळे तुमचे शब्द नीट वापरा. मी कोणाचा अनादर करते असा त्याचा अर्थ होत नाही. मला कोणाच्याही आयुष्यात डोकवण्यात रस नाही म्हणून मी मिक्स होत नाही इतकंच. तसंही तुम्हाला माझ्या नावामुळेच टीआरपी मिळत आहे."

यानंतर स्वत:चा एक व्हिडिओ रेकॉर्ड करत तिने उषा नाडकर्णींना उत्तर दिलं. ती म्हणाली, "मला गर्व आहे अहंकार आहे, मी कोणाशी बोलत नाही. माझं नाव ऐकून अशे तसे तोंडं करत आहेत. हे दाखवणारा आणखी एक व्हिडिओ मी बघितला. पहिले तर मला हे सांगायचंय की मी सगळ्यांचा खूप आदर करते. तुमच्या आयुष्यात काय चाललंय, तुम्ही बरे आहात की नाही मला काहीही जाणून घ्यायचं नाही. मला काहीही फरक पडत नाही. कारण माझं मन किती स्वच्छ आहे, मी स्वर्गात जाईन की नरकात याचा निर्णय देवच घेईल. मी चांगली आहे की वाईट आहे याचं मला तुमच्याकडून प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही. जर मी तुमच्या हो ला हो म्हणेन, तुम्ही सांगाल तसं करेन तर निक्की खूप चांगली आहे. आणि जर मी तुमच्या विरोधात आहे किंवा मी जास्त बोलत नाहीये कारण मी इंट्रोव्हर्ट आहे तर मला तुमच्याबद्दल जाणून घेण्यात काहीच रस नाही. मग याचा अर्थ मी वाईट आहे किंवा अहंकारी आहे असा होत नाही."

टॅग्स :उषा नाडकर्णीटिव्ही कलाकारट्रोल