Join us

चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होऊ दे वायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 13:02 IST

400 भागांच्या सेलिब्रेशनमध्ये 'चला हवा येऊ द्या'च्या 'होऊ दे वायरल' नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली. या पर्वात तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक ज्यांच्यामध्ये प्रेक्षकांना हसवण्याचा कीडा आहे ते सहभागी होऊ शकतात.

ठळक मुद्देचला हवा येऊ द्या'ने 400 भागांचा यशस्वी पल्ला गाठला आहे 'चला हवा येऊ द्या'च्या कुटुंबात आता नवीन सदस्यांची भर पडणार आहे

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने 400 भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. 'चला हवा येऊ द्या'ने नेहमीच नावीन्यपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 400 भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. 'चला हवा येऊ द्या'चे विनोदवीर आता नवीन काय हस्यकल्लोळ प्रेक्षकांसाठी घेऊन येणार ही उत्सुकता सर्वांनाच आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिघेल न नेता नुकतंच झालेल्या 400 भागांच्या सेलिब्रेशनमध्ये 'चला हवा येऊ द्या'च्या 'होऊ दे वायरल' नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली. या पर्वात तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक ज्यांच्यामध्ये प्रेक्षकांना हसवण्याचा कीडा आहे ते सहभागी होऊ शकतात. यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरात ऑडिशन्स घेण्यात आले आणि त्यांची निवड देखील करण्यात आली. 'चला हवा येऊ द्या'च्या कुटुंबात आता नवीन सदस्यांची भर होणार आहे आणि हे नवे विनोदवीर देखील तितक्याच ताकदीने प्रेक्षकांचे मनोरंजन करतील यात शंकाच नाही.

टॅग्स :चला हवा येऊ द्या