Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर आमचे घर'मालिकेत नारायणी काव्याला एका महिन्याच्या आत घरातून बाहेर काढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:20 IST

नारायणीने काव्याला एका महिन्याच्या आत घरातून बाहेर काढायचं ठरवलं आहे.

 'सासूसुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम', असं म्हणत सुरू झालेली 'सुंदर आमचे घर' ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचली आहे. कारण काव्या राजपाटील यांची सून होऊन घरी आली आहे. खाष्ट आजेसासू नारायणी आणि चतुर काव्या यांची अनोखी जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळते आहे. जुने विचार, रूढी, परंपरा जपणारी नारायणी आणि परंपरा, संस्कृती नव्या पद्धतीने जपणारी काव्या या आता आमेनसामने आल्या आहेत. राजपाटीलांच्या घरात काव्याने आता चतुराईचा उपयोग करून 'काव्यागिरी' सुरु केली आहे. राजपाटीलांच्या घरत सून म्हणून आल्यावर काव्याला तिच्या सासूबाईंचा म्हणजेच सुभद्राचा खूप आधार मिळतो आहे. सुभद्रा काव्याला सून नाही तर मैत्रिणीसारखं प्रेम करते.

     काव्या लग्न करून घरी आल्यावर नारायणी देवघराचा दरवाजाला कुलूप लावून ठेवते. त्याची किल्ली सुभद्राला सापडत नाही पण काव्या युक्तीचा उपयोग करून केसांमध्ये लावण्याच्या पिनेने दरवाजाचं कुलूप उघडते आणि सगळ्यांना चकित करते. नारायणी काव्याची फजिती करण्यासाठी तिला चुलीवर स्वयंपाक करायला सांगते आणि काव्या तिथेही शक्कल लढवते. काव्या स्वयंपाक तर गॅसवरच करते आणि नंतर कोळसा गरम करून त्याला धूर देते आणि त्यामुळे पदार्थांना चुलीची चव येते आणि काव्याची काव्यागिरी सफल होते. नारायणीने काव्याला एका महिन्याच्या आत घरातून बाहेर काढायचं ठरवलं आहे. पण काव्यानेही काव्यागिरीच्या माध्यमातून घरी स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतलाय. काव्या आणि नारायणी यांचा हा सामना प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देणार आहे. नारायणीच्या परंपरा जपण्याच्या विचारला काव्या अनोख्या पद्धतीने, आजच्या काळातल्या गोष्टींचा उपयोग करून कसं जपते, त्यात तिला सुभद्रा आणि रितेशची मदत होते का, काव्या अजून कोणकोणत्या पद्धतीने काव्यगिरी करते?, या प्रश्नांची उत्तर लवकर प्रेक्षकांना मिळतील.

टॅग्स :सोनी मराठी