Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट, नव्या वळणावर बदलणार नात्यांचे रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:12 IST

‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील दीपा, कार्तिक, सौंदर्या, ललित, श्वेता अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. आता या मालिकेचे कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेतील नव्या वळणावर आता नात्यांचे रंग बदलताना दिसणार आहेत.

दीपाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे खरा पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच आहे. जन्मानंतर दीपाचे एक बाळ तिच्यापासून दूर झाले आहे. तर दुसऱ्या बाळाचे पितृत्वच तिच्या वडिलांनी म्हणजेच कार्तिकने नाकारले आहे. त्यामुळे दीपाने आता माझी मुलगी वडिलांच्या नावाची भीक मागणार नाही असे ठणकावून सांगत एकटीने मुलीला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दीपा-कार्तिकच्या नात्यातली कटुता मुलींच्या जन्मानंतर तरी दूर होईल असे वाटत होते. सौंदर्याने पुढाकार घेत या दोघांमधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नाही तर दीपाची एक मुलगी आपल्या घरात आणून कार्तिकचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती बदलण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे दीपा-कार्तिक आणि त्यांच्या मुलींच्या नात्याचे भवितव्य नेमके काय असणार याची उत्सुकता आता वाढली आहे. त्यासाठी रंग माझा वेगळा मालिका पहायला लागेल.

टॅग्स :स्टार प्रवाह