Join us

नाती जोडण्याचं काम बायकोलाच जमतं,'बायको अशी हव्वी’ नवी मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 08:00 IST

सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवर्‍याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल... ही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.

जिच्याविना वैकुंठाचा कारभार चालंना,एकल्या विठुरायला संसार पेलंना !!! जिथे देवसुध्दा त्याचा संसार एकटा सांभाळू शकत नाही तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसांचे काय! पण दुर्दैवाने प्रत्यक्षात असं चित्र फार कमी ठिकाणी बघायला मिळतं... कुटुंबात अधिकार पुरुषाचाच अशी आपली पारंपरिक विचारसरणी. खरंतर संसाररथाचा तोल सावरला जातो तो स्त्रीमुळेच... प्रत्येक कुटुंबाला पूर्णत्त्व येतं ते स्त्रीच्या अस्तित्त्वामुळे... घराला घरपण हे तिच्यामुळेच असते…पण तरीदेखील डावललं जातं तिलाच... मनात कितीही वादळं सुरू असली तरीदेखील ती तिच्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाही… स्त्री स्वत:ला पूर्णत: संसारात झोकून देते, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जपते.

 

पण तरीही स्त्रीला गृहित धरण्याचीच पद्धत बहुसंख्य घरांत दिसते. तिच्या मतांचा आणि भावनांचा फारसा विचार केला जात नाही. उपवर मुलगी संसाराचं सुंदर स्वप्न घेऊन सासरी येते, साखर पाण्यात जशी सहज विरघळावी तशी संसारात मिसळून ती गोडवा आणते. ती हे सगळं निरपेक्षपणे पार पाडत असते पण त्या बदल्यात तिच्या वाट्याला काय येतं ? सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवर्‍याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल... ही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.

भय्यासाहेब राजेशिर्के हे खूप मोठं प्रस्थ मानलं जातं... त्यांचा मुलगा विभास ज्याच्या खांद्यावर घराची, व्यवसायाची जबाबदारी आहे... बाहेरून बघता राजेशिर्के एक आदर्श कुटुंब आहे... पण घरातलं आतलं चित्र मात्र या विरुध्द आहे... पुरूषांचे वर्चस्व घरामध्ये  पिढ्यानपिढ्या चालत आले आहे... बायकांनी उबरंठा ओलांडायचा नाही, चूल आणि मूल याच काय त्या बायकांच्या जबाबदार्‍या अशी त्यांची विचारसरणी आहे... घरातील स्त्रियांच्या म्हणण्याला काडीमात्र महत्त्व दिले जात नाही, त्यांची इच्छा जाणून घेतली जात नाही आणि यामध्ये बायकांची घुसमट होत आहे. घरातील बायका हे निमूटपणे सहन करत आहेत.

 

 पुरषी अहंकाराला जपत आहेत.. याउलट एका छोट्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंब जे स्त्री – पुरुष असा भेदभाव अजिबात मानत नाही...अशा घरात वाढलेली आजच्या विचारांची मुलगी जान्हवी जेव्हा पुरुषप्रधान संस्कृती रुजलेल्या घरामध्ये लग्न होऊन येते तेव्हा काय घडतं? विभास आणि जान्हवीचं लग्न कोणत्या परिस्थितीत होतं ? यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ? संसाराबद्दल या दोघांचीही मतं वेगळी आहेत. त्यांची मनं जुळतील ? हा प्रवास पाहणं रंजक असणार आहे.

मालिकेचे लेखक - दिग्दर्शक विरेन प्रधान म्हणाले, “शेंदूराचे लेप खरवडले की आत मूर्तीऐवजी दगड सापडतो, तसंच आधुनिकतेचा, संमजसपणाचा लेप खरवडला की बहुसंख्‍य पुरुषांचा स्त्रि‍यांकडे बघण्‍याचा जुनाट दृष्टिकोन आजही तसाच आहे हे जाणवतं…लग्‍न करताना मुलगी बायको मटेरिअल पाहिजे म्‍हणजे स्‍वयंपाकपाणी करणारी, घर सांभाळणारी असावी आणि ते तिचं मुख्‍य ध्‍येय असावं हे पाहिलं जातं.. हे ध्‍येय नवरा आणि बायको दोघे मिळून निभावू शकतात याकडे सोयि‍स्‍कर दुर्लक्ष केलं जातं.

अजूनही बाईची कर्तव्‍य आणि पुरुषाची कर्तव्‍य अशी लेबलं लावूनच बायकांकडे पाहिलं जातं.. या मुखवटयाचं.. मुखवटयांआड घुसमटणा-या स्त्रि‍यांची, आणि ते मुखवटे फाडून नवं, ख-या सहजीवनाचं चित्र उभं करणा-या नायिकेची ही गोष्‍ट आहे”.स्त्री शिवाय कुटुंब नाही, संसार नाही… पण, तरीही तिला तितकंसं महत्त्व कुटुंबात मिळत नाही आणि याचा अनुभव जान्हवीला राजेशिर्केंच्या घरी येणार आहे... जान्हवी तिच्या गोड स्वभावाने कसे त्यांचे मतपरिवर्तन करेल ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.