Navratri 2025 Kushal Badrike: शारदीय नवरात्र सुरू झालं आहे. हिंदू धर्मातील हा अतिशय मोठा उत्सव मानला जातो. नवरात्रोत्सवात देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव आणखी एका गोष्टीसाठी ओळखला जातो ती म्हणजे नवरात्रीतील रंग. नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी एक रंग परिधान केला जातो. स्त्रीशक्तीला समर्पित असल्याने याकाळात विविध रंग परिधान करून स्त्रीशक्तीच्या रुपांना गौरविण्यात येते. अगदी आनंदाने रंग फॉलो करताना अनेकजण दिसतात. अशातच काल (२२ सप्टेंबर) रोजी पांढरा (सफेद) रंग होता. तर आज (२३ सप्टेंबर) रोजी लाल रंग आहे. अशातच अभिनेता कुशल बद्रिकेनेही नवरात्रीमधील नऊ रंगांबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात त्याने मजेशीर पद्धतीने 'रंग' या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "नवरात्रीचा आणि नऊ रंगांचा काय संबंध? ह्या विचारात असताना...". नवरात्रीच्या नऊ रंगांचा संदर्भ देत कुशलने म्हटले आहे की, "रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण त्या रंगांचा उपयोग नवरात्रीत होत नाही. तसंच, रंग बदलणाऱ्या सरड्यालासुद्धा नवरात्र साजरी करता येत नाही."
त्याने पुढे होळी आणि नवरात्रीमधील फरक स्पष्ट करताना म्हटले, "होळीत आपण आपल्या अंगाला वेगवेगळे रंग लावतो, तर नवरात्रीत आपण कपड्यांच्या वेगवेगळ्या रंगांना आपलं अंग लावतो". कवी सुरेश भटांच्या 'रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा' या गाण्याचा संदर्भ देत कुशल म्हणाला, "या गाण्यात ज्या रंगाविषयी बोललं जातंय, तो रंग दाखवण्याचा नसून वैयक्तिक अनुभवण्याचा आहे. म्हणूनच नवरात्रीत त्या रंगांचा उपयोग होत नाही आणि कदाचित म्हणूनच हे गाणं गरब्यात वाजत नाही".
पुढे कुशल बद्रिके म्हणाला, "उत्तर प्रदेशात जन्माला आलेल्या कृष्णाची रासलीला गुजरातमध्ये मानल्या जाणाऱ्या संतोषी मातेपुढे खेळली जाते आणि महाराष्ट्रात हा उत्सव जोरदार साजरा केला जातो. त्यामुळे या उत्सवाला जाती-पातीचा रंग चढत नाही. माणूस म्हणून जगण्याची खरी रंगत येते, हे या सणाचं मला वैशिष्ट्य वाटतं. नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा" असे म्हणत त्याने आपला व्हिडिओ संपवला. कुशलचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक सकारात्मक प्रतिक्रिया येत असून, नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. कुशल बद्रिके त्याच्या विनोदी आणि विचार करायला लावणाऱ्या पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असतो.