Join us

चंद्र-नंदिनी या मालिकेत नंदिनीचे होणार अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 13:58 IST

चंद्र-नंदिनी या मालिकेच्या कथानकाला आता चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या नंदिनीचे अपहरण झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला ...

चंद्र-नंदिनी या मालिकेच्या कथानकाला आता चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या नंदिनीचे अपहरण झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चंद्र-नंदिनी या मालिकेत नंदिनीने महाराणी बनण्यासाठी स्वीकारलेली सर्व आव्हाने तिने आता पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता ती महाराणी बनली असल्याचे आपल्याला लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. महाराणीच्या गादीवर नंदिनीला बसवण्यासाठी आता काही विधी केले जाणार आहेत आणि याची जय्यत तयारी सुरू आहे. पण हे विधी करण्यापूर्वी नंदिनीने राजवाड्यात न राहाता काही दिवस गावात राहावे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ती काही दिवसांसाठी चंद्रसोबत गावात राहायला जाणार आहे. पण राज्यभिषेकासाठी गावावरून राजवाड्यात परतत असताना नंदिनीचे अपहरण होणार आहे आणि तिचे हे अपहरण दुसरे कोणी नाही तर रूपा करणार आहे. रूपा ही नंदिनीसारखीच दिसणारी एक मुलगी आहे. रूपा नंदिनीचे अपहरण करून राजवाड्यात तिची जागा घेणार आहे आणि तिच्या लोकांना नंदिनीला मारून टाकायला सांगणार आहे. नंदिनीची हत्या करून राणीच्या गादीवर बसण्याची तिची इच्छा आहे. पण राजवाड्यात आल्यानंतर चंद्र ज्यावेळी नंदिनीला म्हणजेच रूपाला भेटणार आहे. त्यावेळी तिच्या वागणुकीत खूप बदल झाल्याचे त्याला जाणवणार आहे आणि तिच्या वागणुकीत इतका बदल कसा काय होऊ शकतो यामागचे रहस्य शोधण्याचा तो प्रयत्न करणार आहे. चंद्रला रूपाचे खरे रूप कळते का? आणि रूपाच्या तावडीतून तो नंदिनीची सुटका करतो का? तसेच नंदिनी जिवंत राहाते की नाही याची उत्तरे प्रेक्षकांना पुढील काळात पाहायला मिळणार आहेत. चंद्र-नंदिनी या मालिकेत श्वेता बासू प्रसाद नंदिनीची तर रजत टोकस चंद्रची भूमिका साकारत आहे.