नकुशी... तरी हवीहवीशी मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 11:35 IST
प्रसिद्धी आयलवार आणि उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका असलेली नकुशी... तरी हवीहवीशी या मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा पार ...
नकुशी... तरी हवीहवीशी मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा
प्रसिद्धी आयलवार आणि उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका असलेली नकुशी... तरी हवीहवीशी या मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा पार केला. या मालिकेच्या टीमने केक कापून आपला हा आनंद नुकताच मालिकेच्या सेटवर साजरा केला.नकुशी ही प्रथा आजही गावाखेड्यात पाहायला मिळते. या सामजिक प्रथेवर आधारित असलेल्या नकुशी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेत महाराष्ट्रातील गावखेड्यांचे चित्रण करण्यात आले आहे. या मालिकेचे सुरुवातीचे चित्रीकरण हे कोणत्याही सेटवर न करता आऊटडोअर करण्यात आले होते. तसेच कास पठारावर एका प्रेमगीताचे चित्रणदेखील करण्यात आले. या सगळ्या वेगळेपणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही गाव खेड्यांमध्ये नकुशी ही अंधश्रद्धा कायम आहे. एक किंवा दोन मुलींनंतर पुन्हा मुलगी झाल्यास तिचे नाव नकुशी ठेवल्यास पुढचे अपत्य मुलगा होतो असा अनेक ठिकाणी समज आहे. या पार्श्वभूमीवर असलेली ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूप आवडत आहे. नकुशी या एका मुलीचा प्रवास आणि तिचे भावविश्व नकुशी... तरीही हवीहवीशी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळात आहे. या मालिकेचे तब्बल 43 दिवसांचे चित्रीकरण वाई आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात करण्यात आले आहे. या मालिकेद्वारे उपेंद्र लिमयेने कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. या मालिकेत आता रणजीत शिंदेमुळे नकुशीचे आयुष्य बदलून जाणार का हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. दिया और बाती हम या प्रसिद्ध मालिकेची निर्मिती केलेल्या शशी सुमीत प्रॉडक्शची ही पहिली मराठी मालिका आहे. या मालिकेत प्रसिद्धी आयलवार आणि उपेंद्र लिमयेप्रमाणेच आदिती देशपांडे, विद्याधर जोशी, स्वाती चिटणीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.