Join us

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर काय म्हणाले मुंबई पोलीस? कसा झाला मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 12:55 IST

Sidharth Shukla Passed Away: काल रात्रीपर्यंत सिद्धार्थ एकदम फिट होता आणि आज अचानक त्याच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देसिद्धार्थच्या निधनाच्या वृत्तानंतर टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

बिग बॉय फेम सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)आज आपल्यात नाही. गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. अर्थात मुंबई पोलिसांनी सिद्धार्थचा मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल बोलण्यास तूर्तास नकार दिला आहे. काल रात्रीपर्यंत सिद्धार्थ एकदम फिट होता आणि आज अचानक त्याच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ आता या जगात नाही, यावर अद्यापही अनेकांना विश्वास बसत नाहीये. (Sidharth Shukla Passed Away)

प्राप्त माहितीनुसार, काल रात्री सिद्धार्थ शुक्लाला बेशुद्धावस्थेत कूपर रूग्णालयात नेण्यात आले. त्याची बहिण आणि जीजू त्याच्यासोबत होते. दरम्यान पोलिस रूग्णालयात पोहोचले असून पोस्टमार्टमनंतरच सिद्धार्थच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या शरीरावर आत्तापर्यंत कोणत्याही जखमा वा व्रण आढळून आलेले नाहीत. पोलिस घाईघाईने कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू इच्छित नाही. त्यामुळे त्यांना पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सिद्धार्थचे कुटुंबीय व जवळच्या लोकांचे जबाब नोंदवणार आहेत.

झोपण्यापूर्वी घेतली होती औषधंप्राप्त माहितीनुसार, सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. यानंतर तो उठलाच नाही. डॉक्टरांच्यानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्तानंतर टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सिद्धार्थची सर्वात जवळची मैत्रिण शहनाज गिल हिला वृत्त कळताच ती शूटींग अर्धवट सोडून रूग्णालयाकडे निघाली. बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थ व शहनाज यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्ला