अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi)मधून घराघरात पोहचली. एवढंच नाही तर ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती झाली. मेघाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर तिने दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. तिला पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. तिचं नाव साक्षी आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिने दुसरं लग्न का केलं, यामागचं कारण सांगितलं आहे.
मेघा धाडे दुसऱ्या लग्नाआधी मुलगी साक्षीचा एकटीने सांभाळ करत होती. काम करत तिचे संगोपन ती करत होती. परंतु तिच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे मेघाने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मेघाने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''तिच्या लेकीला वडिलांची कमतरता भासत होती. या मुलाखतीत साक्षीने सांगितले की, आईने मला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. जरी मला वडील नसले तरी तिने तिला शक्य आहेत, त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी केल्या. त्यावर मेघाने सांगितले की, एकदा तिने मला जाणीव करुन दिली की, आता कोणीतरी आपल्या घरी पाहिजे. आम्ही पूर्वी कांदिवलीमध्ये राहायचो आणि ती बिल्डिंग खूप मोठी होती. खूप विंग्स होत्या त्या इमारतीला. तेव्हा ती ५-६ वर्षांची होती. त्यावेळी मी सुपरस्टार चित्रपटाचं चित्रीकरण करत होते.
मुलीने अभिनेत्रीला करून दिली त्या गोष्टीची जाणीव
''साक्षी त्यावेळी हॉस्टेलमध्ये राहत होती. ती चार वर्षांची असताना मी तिथे ठेवलं होतं. ती सुट्ट्यांमध्ये घरी आली होती तेव्हा मला म्हणाली की, इकडे जे विंगमध्ये असं कोणीतरी असेल ना ज्यांच्याकडे मुलगी नाहीये किंवा बायको नाही. ते माझे पप्पा होऊ शकतात का, तेव्हा मी तिला नाही, असं होऊ शकत नाही, असं सांगितलं होतं. तेव्हा मला जाणवलं की, तिला असं कोणीतरी हवं आहे, जो आमच्या आयुष्यात असल्याने आम्हाला त्याची मदत होईल. मला जाणवलं की, तिला वडिलांची गरज आहे. तेव्हा मी तिला म्हटलं की, आता कोणीच नाही आहे. पण मी तुला वचन देते की, मी तुझ्यासाठी चांगला वडील शोधेन. मग तुझेही बाबा असतील आणि ते खूप चांगले असतील. आता मला असे वाटते की मी तिच्यासाठी चांगला बाबा शोधला आहे.'', असे मेघाने सांगितले.
मेघा धाडे हिने २०१५ साली आदित्य पावसकरसोबत लग्नगाठ बांधली. आदित्य यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. तर मेघालाही एक मुलगी आहे. आता ते सगळेच एकत्र राहतात.