Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरीब आजोबांसाठी दादरच्या रस्त्यावर भाजी विकताना दिसली मराठमोळी अभिनेत्री, होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 10:41 IST

भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, सफाळ्याची भाजी दादरला आलीय...हा महिलेचा आवाज ऐकून दादरमधील मार्केटमध्ये बघ्यांनी गर्दी झाली होती.

भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, सफाळ्याची भाजी दादरला आलीय...हा महिलेचा आवाज ऐकून दादरमधील मार्केटमध्ये बघ्यांनी गर्दी झाली होती. हा आवाज होता अभिनेत्री किशोरी अंबिये (Kishori Ambiye) यांचा. किशोरी अंबिये नुकत्याच लोकमत फिल्मीच्या स्टार थ्रिल्स या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी दादरमधील एका भाजी विक्रेत्यांची फळं आणि भाजी विकण्यासाठी मदत केली. त्यांना पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. 

किशोरी अंबिये यांचे बालपण दादरमध्ये गेले आहे. लोकमत फिल्मीच्या स्टार थ्रिल कार्यक्रमामुळे अभिनेत्रीला त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्या बालपणी ज्या काकांकडून भाजी घेत होत्या. त्यांच्यासाठीच किशोरी यांनी भाजी विकण्यासाठी मदत केली. त्या म्हणाल्या की, स्टार थ्रिल्स शोसाठी मी उत्सुक होते. माझ्या दादरच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे त्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. माझं बालपण दादरमध्ये गेलंय. हे नुसतं थ्रिल नसून माझ्यासाठी गिफ्ट आहे. 

'त्यांची भाजी खाऊन झाले मोठे'

लहानपणापासून ज्यांच्याकडे भाजी घेतली त्यांच्यासाठी किशोरी यांनी भाजी विकली. त्या भाजी विक्रेत्यांनी किशोरी यांना लहानांचे मोठे होताना पाहिले आहे. त्यांनी देखील त्यांना ओळखलं. त्या म्हणाल्या की, हे माझे काका आहेत. ते मला लहानापणापासून ओळखतात. मला खूप बरं वाटतंय. आज मी त्यांच्यासाठी भाजी विकणार आहे. त्यांची भाजी ऑर्गनिक असते. मी ह्यांची भाजी खाऊन लहानाची मोठी झालीय. ते सफाळ्यावरून भाजी आणतात. 

किशोरी यांना पाहून भाजी घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. भाजी घेतली तर फोटो देणार असे म्हणत किशोरी अंबिये यांनी भाजी विकली. 

वर्कफ्रंट

किशोरी अंबिये या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनयाने त्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. सध्या त्या वस्त्रहरण नाटकात काम करत आहेत. तसेच लक्ष्मीच्या पाऊलांनी, अजब प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतही पाहायला मिळत आहेत