Join us

टीआरपीच्या शर्यतीत अव्वल, १४ महिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर 'ही' मालिका घेणार निरोप? होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:12 IST

छोट्या पडद्यावरील 'ही' लोकप्रिय मालिका होणार बंद? चाहते नाराज

Marathi Serial : सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिकांची घोषणा होताना दिसतेय. शिवाय टीआरपीची चढाओढ देखील होताना दिसत आहे. काही मालिकांमध्ये टीव्हीवर गाजलेले चेहरे पुन्हा छोट्या पडद्यावर दिसत आहेत, तर काहींमध्ये नवे चेहरे झळकणार आहेत. अलिकडेच स्टार प्रवाह वाहिनीलर 'लपंडाव ' आणि 'नशीबवान' या दोन मालिकांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता कोणती मालिका निरोप घेणार याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात आता एका लोकप्रिय मालिकेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

अभिनेते अजय पूरकर आणि नेहा नाईक यांची प्रमुख भूमिका असलेली 'नशीबवान' मालिका लवकरच छोट्या पडद्यावर प्रसारित केली जाणार आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून ही बहुचर्चित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे गेल्या १४ महिन्यांपासून मालिका रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही सिरिअल ऑफ एअर होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिडिया रिपोर्टनुसार, येत्या २५ ऑगस्टला या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग होणार आहे, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, याबाबत वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षी स्टार प्रवाह वाहिनीवर 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका सुरू झाली होती. पहिल्यांदाच वेगळा विषय या मालिकेतून हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मालिकेतील तेजस-मानसीची जोडी अनेकांच्या पसंतीस उतरली. ही पात्रे अभिनेता समीर परांजपे आणि मराठीतील गुणी अभिनेत्री शिवानी सुर्वे साकारत आहेत. या मालिकेत गायत्रीच्या भूमिकेत मानसी कुलकर्णी पाहायला मिळते आहे. गेल्यावर्षी १७ जूनपासून ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल असणारी ही लोकप्रिय टीव्ही मालिका आता ऑफ एअर होणार की या मालिकेचा टाईमिंगमध्ये बदल केला जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या मालिकेसंदर्भात माहिती मिळताच अनेक प्रेक्षक देखील नाराज झाले आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया