Jui Gadkari: 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका अव्वल स्थानावर असते. या लोकप्रिय मालिकेत अभिनेता अमित भानुशाली, जुई गडकरी, ज्योती चांदेकर तसेच सागर तळशीकर, नारायण जाधव असे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच अभिनेत्री जुई गडकरीनेसोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट करण्यामागे कारणही तितकच खास आहे. मालिकेत मधुकर पाटील नावाची भूमिका साकारणारे अभिनेते नारायण जाधव साकारत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने जुईने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्याविषयी भरभरुन लिहिलं आहे. 'ठरलं तर मग' मध्ये अभिनेते नारायण जाधव यांनी सायलीच्या (जुई) वडिलांची भूमिका साकारली आहे.
जुई गडकरीने मधुभाऊंच्या वाढदिवशी 'ठरलं तर मग' मालिकेच्या पडद्यामागील खास क्षण शेअर केले आहेत. शिवाय ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, मामा, आज तुमचा वाढदिवस! तुमच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच! 'पुढचं पाऊल नंतर' मला तुमच्याबरोबर पुन्हा काम करायचं होतं! आणि 'ठरलं तर मग'च्या निमित्ताने आपण पुन्हा भेटलो! आपली मैत्री आता १५ वर्षांची झाली मामा! तुम्ही सेटवर आमच्याकडून होणारा छळ ज्या प्रेमोने सहन करता त्याला. तुम्हाला कसलाही कितीही त्रास होत असला तरी तुमच्या चेहऱ्यावर ते कधीच दिसत नाही! ही खूप मोठी गोष्टं आहे. आपल्यात वयाचं एवढं अंतर असुनही तुम्ही सेटवर आमच्यातलेच एक होऊन जाता. तुम्ही अक्कलकोटला गेले असताना देऊळ बंद झालं होतं. पण, केवळ मी सांगितलं होतं म्हणून देऊळ उघडेपर्यंत थांबून मी सांगितलेली गोष्टं, माझ्यासाठी तुम्ही केलीत. माझ्यासाठी प्रार्थना करणं, सेटवर सतत माझी काळजी घेणं, शूट नसेल तर मेसेज करुन माझी चौकशी करणं या सगळ्यांनी माझ्या मनात तुमच्याबद्दल असलेला आदर अजून वाढलाय."
त्यानंतर जुईने लिहिलंय, "मी मधुभाऊंची लाडकी साऊ तर आहेच! पण त्याहीपेक्षा जास्तं नारायण मामांची लाडकी जुई आहे हे मला माहित आहे. आपली ही मैत्री अशीच राहो! अगदी मी तुमच्यावयाची होईपर्यंत, कारण एकवेळ मी म्हातारी होईन पण तुम्ही नेहमी आमचे “Bosco” च राहाणार!!! लवकरच सेटवर भेटु! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा..., तुमचा आजचा दिवस चांगला जावो...आज मी एक रील शेअर करत आहे! ते नक्की बघा!! स्क्रीनवर अगदी धीरगंभीर असलेले मामा, ॲाफस्क्रीन सॅाल्लीड मजेशीर आहेत!! आणि सहनशीलही..., अशा सुंदर शब्दांत लिहून अभिनेत्रीने मधुभाऊंचं कौतुक केलं आहे.