Prajakta Gaikwad: 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) ही घराघरात पोहोचली. या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारुन अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली. मालिकेतील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. परंतु सध्या प्राजक्ता सध्या छोट्या पडद्यापासून थोडी दुरावली आहे. त्यात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने मालिकाविश्वात कमबॅक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अलिकडेच प्राजक्ता गायकवाडने 'सकाळ प्रिमिअर'ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला तुला ऐतिहासिक भूमिकांमध्ये बघितल्यानंतर प्रेक्षकांना तुला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर तुला मालिकांच्या अशा काही ऑफर्स आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना प्राजक्ता गायकवाड म्हणाली, खरंतर मालिका झाल्यानंतर मी असा विचार केला होता की आपण आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी काही तरी करुयात. पण, आता परत मालिकांच्या ऑफर सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मी विचार करतेय की एखादी छान स्क्रीप्ट असेल तर मी नक्की पुन्हा एकदा प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर दिसेन."
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "सध्यातरी चित्रपटांसाठी काम चालू आहे. वेगवेगळ्या भूमिका असलेले चित्रपट चालू आहेत. काहींचं साउथमध्ये शूटिंग चालू आहे. तर काही चित्रपटांचं शूट महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. पण, सगळं छान आहे. वेगळ्या टॅंलेंटेड भूमिका घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये केला.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने मालिकांमधून ऐतिहासिक भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. 'स्वराज्यरक्षक संभाजी','आई माझी काळूबाई' या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.