Ankita Panvelkar Shared Video: कॅडबरी, चॉकलेट्सचे प्रोडक्ट्स अनेकजण आवडीने खात असतात. परंतु, बऱ्याचदा मोठमोठ्या शॉपिंग मॉल्स किंवा दुकानांमध्ये या प्रोडक्टसच्या बाबतीत निष्काळजीपणा केला जातो. जो ग्राहकांच्या जीवावर बेतू शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'हुकुमाची राणी' मालिकेतील अभिनेत्री अंकिता पनवेलकर आणि अभिनेत्री जोत्स्ना पाटील यांनी नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला. साताऱ्यातील एका डिमार्टमध्ये त्यांनी खरेदी केलेल्या कॅडबरीच्या चॉकलेट बारमध्ये त्यांना चक्क अळ्या आणि बुरशी आढळली आहे. त्याचा व्हिडीओ त्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना खास सल्ला देखील दिला आहे.
अभिनेत्रीने अंकिता पनवेलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, अंकिता पनवलेकर आणि जोत्स्ना पाटील या दोघी सातारा येथील डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथून त्यांनी डेअरी मिल्कची कॅडबरी खरेदी केली. डी-मार्टच्या बाहेर येताच त्यांनी ती डेअरी मिल्क खाण्यासाठी उघडली. तेव्हा त्या कॅडबरीला बुरशी लागलेली त्यांना दिसली. अजून बारकाईने पाहिल्यानंतर त्यांना अळ्यांची हालचाल देखील जाणवली. या सगळा प्रकार त्यांनी कॅमेऱ्यात कैद करुन व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये अंकिता पनवेलकर म्हणते- "खरंतर कुठल्याही कंपनीला बदनाम करण्याचा आमचा हेतू नाही आहे. आताच आम्ही डी-मार्टमधून कॅडबरी घेतली आहे. याच्यामध्ये अळ्या आणि त्याला भोकं पडली आहेत. त्याचबरोबर कॅडबरीला बुरशी लागली आहे. सुदैवाने आता दुपार असल्यामुळे आम्ही आवडीने ही कॅडबरी घेतली पण त्याच्यामध्ये आम्हाला हे दिसलं. आम्ही म्हणून ते नीट बघू शकलो पण लहान मुलं न बघता तोंडात टाकतात त्यामुळे अशा प्रोडक्टची दखल कंपनीने वेळीच घ्यायला हवी असं मत अंकिताने मांडलं आहे. फक्त कंपनीने अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं कारण आपल्याकडून लोकांपर्यंत अशा पद्धतीच्या गोष्टी जात आहेत. याबद्दल कंपनीने विचार करावा. म्हणून कोणालाही इतकं हलक्यात घेऊ नका." असं अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.