Akshayaa Gurav: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा प्रचंड वाढला आहे. या मालिका त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग बनत चालल्या आहेत. दरम्यान, मालिकाविश्वात असे चेहरे आहेत जे प्रेक्षकांना वारंवार पाहायला मिळतात. त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करुन राहतात. असाच एक मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा म्हणजे अक्षया गुरव. 'आई कुठे काय करते', 'मानसीचा चित्रकार तो', 'राधा प्रेम रंगली' आणि 'लव्ह लग्न लोचा' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री अक्षया गुरव घराघरात पोहोचली. मात्र, काही काळ अभिनेत्री छोट्या पडद्यापासून काहीशी दूर होती. त्यानंतर आता अक्षया गुरव प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
अभिनेत्री अक्षया गुरवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने मालिकाविश्वात पुनरागमन करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. लवकरच अभिनेत्री सन मराठी वाहिनीवरील आदिशक्ती या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर अक्षयाने मालिकेचा आगामी प्रोमो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
दरम्यान, अक्षया देवधर बऱ्याच काळानंतर मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. आदिशक्ती मालिकेच्या येत्या ८ एप्रिलच्या भागात प्रेक्षकांना अभिनेत्रीची झलक पाहायला मिळणार आहे. ही मालिका रोज रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते.