Shashank Ketkar Video : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो मुरांबा मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो आहे. या मालिकेत अक्षय मुकादम नावाचं पात्र साकारुन त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दरम्यान, आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारा हा अभिनेता त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखला जातो. सध्या शशांक त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
शशांक केतकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या प्रोजेक्टसह वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो यामार्फत देत असतो. मुंबईतील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे असो किंवा कचरा अशा वेगवेगळ्या मुद्यांवर तो भाष्य करत असतो. अशातच नुकताच अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मढ आयलंड येथील मढ आयलँड मधील रस्त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तेथील रस्त्याची दयनीय अवस्था पाहून अभिनेत्याने म्हटलंय,"या देशातील रस्ते, रस्त्यांची एकंदर परिस्थिती हा फारच गमतीशीर विषय आहे. मला त्याबद्दल कायमच बोलायला आवडतं. कारण, हा देश माझा आहे. या देशातील रस्ते माझे आहेत आणि या रस्त्यांवरती माझ्या पैशाने विकत घेतलेली महागडी गाडी मी स्वत: चालवणार आहे."
शशांक पुढे म्हणतो,"आजचा विषय आहे मढचा रस्ता. बरं, आजचा मुद्दा मांडण्याआधी एक डिसक्लेमर देतो.इंडस्ट्रीमधील माझा असा एक मित्र परिवार आहे. जो मला चिडवत असतो की आला आमचा म्होरक्या आला. हा सगळ्या रस्त्यांबद्दल बोलणार. यालाच सगळे खड्डे दिसतात.मला त्यांना एकच सांगायचं आहे की, मित्रांनो या रस्त्यावरती फक्त मी एकटा गाडी चालवणार नाही. कारण ही रस्ता माझ्या एकट्याचा बापाचा नाही. तुमच्याही बापाचा नाही. हा आपल्या देशाचा रस्ता आहे. शूटिंगसाठी जसं मी इथे येतो, तसं तुम्हीसुद्धा येता. उद्या माझी गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली, माझ्या गाडीचं काही नुकसान झालं तसं परवा तुमच्याही गाडीचं नुकसान होऊ शकतं आणि ते होऊ नये म्हणून माझा कायम प्रयत्न असतो. तर मी जर तुमचा म्होरक्या असणार असेन, तर असू दे. तुम्ही बोलत नसाल, तर मलाही हे बोलू दे."
पुढे शशांक म्हणतोय की,"मढ आयलॅंडवरील जो रस्ता आहे. तो अनेक दशकं तयार झालेला नव्हता. त्यामध्ये अनेक अडचणी होत्या, त्यात गावऱ्यांचीही काही मागणी होती. तर शूटिंग करणाऱ्यांची वेगळी मागणी होती. इथे कितपत बेकायदेशीर पद्धतीने काम चालतं हा विषय वेगळा आहे. जर तुम्हाला विकास करायचा असेल, इकडे एक वेगळी इंडस्ट्री उभी करायची असेल. या गावकऱ्यांनी सुखी आयुष्य द्यायचं असेल तर तुम्हाला विकास करावा लागणार आहे. जो रस्ता अनेक दशकं झालेला नव्हता, तो आता ५०-६० टक्के बनवला गेला आहे."
मग तो म्हणाला, "जो तयार झालेला रस्ता आहे. त्यामध्ये ड्रेनेजला लोखंडी झाकणं लावलेली आहेत. ती इतकी ताकदवान आहेत की ट्रक सोडाच. पण, सायकल त्याच्यावरुन गेली तरी तुटतील. तर त्याचं उदाहरण बघा.' असं म्हणत शशांकने ड्रेनेजची तुटलेली झाकणं दाखवली आणि त्यावर नारळाची झावळी टाकलेली होती.मागच्या एक दीड आठवड्यांपासून या ड्रेनेजची अवस्था अशीच आहे आणि महानगरपालिकेचं हे म्हणणं असेल की आम्ही काम करणारच आहोत, म्हणून नारळाची झावळी खोचून ठेवली आहे. तर तुमची अॅक्शन कमाल आहे. आमच्या महागड्या गाड्यांचं चाक जर त्यामध्ये गेलं,तर त्या गाड्या अडकून पडणार आहेत. आमच्या गाडीला डॅमेज होणार आहे. तर महानगरपालिकेला माझी विनंती आहे की आमचं जे काही डॅमेज होईल, ते भरण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. एखादा बाईक चालवणारा तिथून गेला, तर त्याच्या जीवाची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?'
या व्हिडीओला कॅप्शन देत अभिनेत्याने लिहिलंय, "हायवे, असो वा शहरातला, गावातला छोटा रस्ता… प्रवास करणारा जिवंत माणूस असतो. अनेक चालक नियम पाळत नाहीत मान्य आहे पण या अशा उघड्या गटारांचं काय करायचं? या गटारांमुळे अपघात झाला, जीव गेला तर जबाबदार कोण ? की मुंबईच स्पिरिट या नावाखाली हेही सहन करायचं आम्ही ? शेवटी आपल्या देशात आपल्या जीवाची किंमत शून्य आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो. आपली लोकसंख्याच इतकी आहे की या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर काय बिघडलं! मला आशा आहे की, यावर तातडीने कारवाई केली घेतली जाईल आणि संभाव्य अपघात टाळले जातील. माझा तुमच्यावर विश्वास आहे.", असं म्हणत अभिनेत्याने त्याचं मत व्यक्त केलं आहे.
Web Summary : Actor Shashank Ketkar slams the poor road conditions in Madh Island, highlighting broken drainage covers. He questions the authorities' negligence and responsibility for potential accidents and vehicle damage, urging immediate action to prevent harm.
Web Summary : अभिनेता शशांक केतकर ने मढ़ द्वीप में सड़कों की खराब हालत की आलोचना की, टूटे हुए ड्रेनेज कवर पर प्रकाश डाला। उन्होंने संभावित दुर्घटनाओं और वाहनों के नुकसान के लिए अधिकारियों की लापरवाही और जिम्मेदारी पर सवाल उठाया, नुकसान को रोकने के लिए तत्काल कार्रवाई का आग्रह किया।