Join us

"हा आजार शत्रूला देखील होऊ नये...", प्रिया मराठेबद्दल बोलताना अभिनेत्याच्या तोंडून शब्द निघेना, झाला भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:58 IST

प्रिया मराठेबद्दल बोलताना अभिनेता झाला भावुक, म्हणाला-"हा आजार शत्रूला देखील होऊ नये..."

Abhijeet Khandkekar: छोट्या पडद्यावरील 'चार दिवस सासूचे', 'पवित्र रिश्ता' तसेच 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठे. अलिकडेच या अभिनेत्रीचं  कर्करोगाने निधन झालं. केवळ ३८ वर्षांच्या वयात तिने कर्करोगाशी लढता लढता अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. या धक्क्यातून कोणीही सावरलेलं नाही. प्रियाने तिच्या कारकि‍र्दीत अनेक कलाकारांबरोबर काम केलं. 'तुझेच मी गात आहे' या मालिकेत तिने अभिजीत खांडकेकर सोबत एकत्र स्क्रिन शेअर केली होती. त्यातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने सहकलाकार प्रिया मराठेच्या निधनाबद्दल भावुक प्रतिक्रिया दिली आहे. 

'लोकमत फिल्मी'शी बोलताना अभिजीत खांडकेकरने अलिकडच्या भेटीचा किस्सा सांगितला. त्यादरम्यान, तो म्हणाला, "आम्ही तिच्याघरी पार्टी केली होती. कारण, ज्यावेळेला मालिकेतून तिला एक्झिट घ्यावी लागली होती. तिच्या तब्येतीची सर्वांना कल्पना होतीच पण तरी सुद्धा त्यादरम्यान आम्हा सगळ्यांना प्रिया-शंतनूने त्यांच्या घरी बोलावलं होतं. अगदी मालिकेतील दोन लहान मुलींपासून त्यांचे आई-वडील शिवाय दिग्दर्शक, निर्माते आम्ही सगळे तिच्या घरी जमलो होतो. त्यावेळी खूप गप्पा झाल्या, खाणं-पिणं सगळं झालं आणि आम्ही गाणी गायली. तिने पण मला सांगितलं होतं की, मला माहिती नाही पुढे कितपत शक्य होईल न होईल पण यावेळी सगळ्यांना घरी बोलावून मला एन्जॉय करता आलं तर छान वाटेल."

यापुढे अभिजीत म्हणाला,"पण,त्यानंतर कुठल्याही अभिनेत्रीला असंच वाटत असतं की आपण जास्तीत जास्त छान दिसावं असं वाटतं. हा आजार इतका घाणेरडा आहे की शत्रूला देखील होऊ नये. कारण तो तुमची पूर्ण रया घालवतो. शिवाय तब्ब्येतीचा पूर्ण ऱ्हास होतो. त्यावेळी तिच्या मनात असं असावं की ते रुप कोणी बघू नये. तिच्या त्या निर्णायाचा आम्ही आदर करतो. त्यावेळी तिला प्रत्यक्षात जाऊन भेटणारे आम्ही फार मोजके लोक होतो. मला असं वाटतं तिला शेवटच्या काळात जितका त्रास झाला होता, त्यादरम्यान शंतनू आणि तिच्या घरचे इतक्या खंबीरपणे उभे होते, हे खूप महत्वाचं असतं. आता ती जिथे कुठे असेल मला खात्री आहे, त्या यातनांमधून मुक्त झाली असेल. मी तिला मिस करतो आहे. कारण ती माझी एक चांगली मैत्रीण होती. त्या दिवशी देखील बातमी आल्यानंतर तिला ते समोर बघणं माझ्यासाठी कठीण होतं." अशी भावुक प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली आहे.

टॅग्स :अभिजीत खांडकेकरप्रिया मराठेसेलिब्रिटी