Appi Aamchi Collector: छोट्या पडद्यावरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. परंतु मालिकाविश्वात छोट्या सिंबाचं म्हणजेच अप्पी आणि अर्जुनचा मुलाचं पात्र प्रेक्षकांना भावलं आहे. दिवसेंदिवस मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसतेय. दरम्यान, या मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अमोलची कॅन्सरशी झुंज सुरू आहे. अमोलचा आजार तिसऱ्या स्टेजला पोहोचला आहे, त्यामुळे घरी सगळ्यांनाच त्याचं टेंशन आहे. अशातच सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. कॅन्सरचं निदान झाल्यामुळे केमोथेरपीचा सामना करत असलेल्या अमोलची त्याच्या आजाराशी लढाई अधिक तीव्र होत आहे. हळहळू त्याचे परिणाम अमोलच्या आरोग्यावर जाणवू लागले आहेत. त्यामुळे त्याचे केस जात आहेत. पण, लढवय्या सिंबा अगदी धीटपणे या सगळ्याचा सामना करतो आहे. या प्रोमोमध्ये अप्पी-अर्जुन अमोलचे केस कापण्याचा निर्णय घेतात.
अमोल इतक्या भयानक आजाराशी सामना करतोय हे बघताना प्रत्येक दिवस अप्पी आणि अर्जुनसाठी कठीण जात आहे. पण अगदी सहजरित्या अर्जुन अमोलचं मन वळवतो. घरातील सगळे जण लाडक्या सिंबाच्या प्रेमापोटी आपले केस कापतात. त्यांच्या निर्णयामुळे छोटा सिंबा केस कापण्यास तयार होतो. आणि शेवटी म्हणतो आता मी या आजाराल हरवणार! सोशल मीडियावर हा व्हायरल होणारा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील भावुक झाले आहेत.